नेहरु - गांधी कुटुंबाचे योगदान कोणीही पुसू शकणार नाही - शरद पवार

संगमनेर Live
0

नेहरु - गांधी कुटुंबाचे योगदान कोणीही पुसू शकणार नाही - शरद पवार

◻️ हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करण्याचा अहंकारी नरेंद्र मोदींचा प्रयत्न - मल्लिकार्जून खरगे

◻️ काँग्रेसची सत्ता असताना शिवसेनेच्या घरी कधीच ईडी सीबीआय आली नाही - उध्दव ठाकरे

◻️ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हीच राजीव गांधीना श्रद्धांजली - बाळासाहेब थोरात 

◻️ भारत रत्न राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिवस व संकल्प मेळावा संपन्न. 

संगमनेर LIVE (मुंबई) | मुंबई व राजीव गांधी यांचे  वेगळे नाते आहे. राजीव गांधी यांचा देशाच्या उभारणीत मोठा वाटा आहे, देशाला नवी दिशा दिली आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना नेहरू - गांधी म्हटले काय होते माहित नाही, ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिले त्यांच्याविषयी आकसाची भूमिका पंतप्रधान व त्यांचे सहकारी घेतात हे चुकीचे आहे. देशाला आधुनिकतेकडे कसे घेऊन जायचे याचा ध्यास राजीव गांधी यांनी घेतला होता. देश घडवण्यात नेहरू व गांधी कुटुंबाचे मोठे योगदान आहे,देशाच्या इतिहासातून नेहरु - गांधी कुटुंबाचे योगदान कोणीही पुसू शकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यावेळी म्हणाले.

माजी पंतप्रधान भारत रत्न स्व.राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्याचे आयोजन षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला पण त्यांना अहंकार नव्हता मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगु देसमच्या दोन पायाचा टेकू घेऊन सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करु पहात आहेत पण महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवला, असा हल्लाबोल खरगे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर येथील विरोधी पक्षांची सरकारे तोडफोड करून घालवली व भाजपाची सत्ता आणली. मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले व फुटीरांना राज्यसभा बहाल केल्या पण लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चोख उत्तर दिले व जनतेने २४० वरच रोखले. आता विधानसभा निवडणुकीत एकजुटीने लढा व मविआचे सरकार आणा असे आवाहन केले. राजीव गांधी यांनी विविध लसीकरण केले पण कधीच त्यांचा फोटो लावला नाही पण मोदी कोरोना लसीच्या पत्रकावर फोटो लावण्याचे चिल्लर काम केले. भाजपा एक विषारी साप आहे त्याला दूर ठेवा असेही खरगे म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेस पक्ष जास्त दिवस सत्तेत होता पण शिवसेनेशी कधीच सूडभावनेने वागला नाही. काँग्रेस सरकार असताना शिवसेना नेत्यांच्या घरी कधी ईडी, सीबीआय आली नाही. राजीव गांधी शिवसेनेशी कधीच सुडभावनेने वागले नाहीत पण भाजपा मात्र शिवसेनेला संपवायला निघाला आहे. 

राजीव गांधी सभ्य व सुसंस्कृत व्यक्ती होते. राजीव गांधी यांनी कोणताही नारा न देता ४०० पार केले, एवढे बहुमत असतानाही राजीव गांधी यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून पंचायत राज आणले. १९९४ साली भाजपा शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना, काँग्रेस पक्षाने आंदोलने केली तर त्यांच्यावर लाठी उगारायची नाही, असे स्पष्ट बजावले होते. विधानसभा निवडणुकीत आता भाजपाचा सुपडासाफ करायचा आहे. एकजूट व वज्रमुठ करून देशावरचे संकट दूर करू असे आवाहन ठाकरे यांनी केले.
         
प्रभारी रमेश चेन्नीथला यावेळी म्हणाले की, मुंबईच्या विकासासाठी राजीव गांधी यांनी काम केले आहे. देशाला २१ व्या शतकात घेऊन जाण्याचा त्यांनी संकल्प केला व त्यादृष्टीने योजना आखून त्यांची अंमलबजावणीही केली. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले त्याची फळं आज देशाला मिळत आहेत. देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी त्यांनी काम केले. आज राहुल गांधी हे सुद्धा सद्भावनेच्या मार्गाने विघटनवादी शक्तींच्या विरोधात काम करत आहेत. भाजपा देशात धर्म व जातीच्या नावाने फूट पाडण्याचे काम करत आहे त्यांच्याविरोधात लढायचे आहे, असे ते म्हणाले. 
  
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक म्हणाले की, मुंबईचे व काँग्रेसचे वेगळे नाते आहे, १८८४ साली मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली, १९४२ साली महात्मा गांधी यांनी चले जाव चा नारा दिला त्याचाच परिणाम ब्रिटीश सत्ता गेली. आजचे राज्यकर्ते सत्तेसोटी काहीही करु शकतात पण राजीव गांधी यांनी असले राजकारण केले नाही. 

पंतप्रधान झाले त्यावेळी देशात दंगली पेटल्या होत्या, दिल्लीच्या रस्त्यावर उतरून त्यांनी दंगली आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. आसाम, पंजाब, आणि मिझोराम पेटला होता पण शांतता करार करुन स्थानिक पक्षांकडे सत्ता सोपवली. आत्ताचे सत्ताधारी मात्र पक्ष फोडून सरकार स्थापन करत आहेत. देशाच्या एकात्मतेसाठी राजीव गांधी यांनी रक्त वाहिले, असे वासनिक म्हणाले. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, राजीव गांधी यांनी संगणक क्रांती आणली, भारताला २१ व्या शतकात आणले, आणखी काही दिवस ते जिंवत राहिले असते तर भारत जगात महासत्ता बनला असता. बदलापूर मधील घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, १५ ऑगस्टला मुख्यमंत्री बदलापूरमध्ये होते पण त्यांनी ह्या घटनेकडे लक्ष दिले नाही, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, हा मुख्यमंत्री फक्त खूर्ची वाचवणारा आहे.

बदलापूर प्रश्नी महिला काँग्रेस बदलापूरात जाऊन आवाज उठवतील. महाराष्ट्रात महिला अत्याचार सातत्याने होत असताना महायुती सरकारला त्याची खंतही वाटत नाही, ज्यांच्या राज्यात महिला अत्याचार होत आहेत त्यांना सत्तेतून पायउतार करा, असे आवाहन केले. राजीव गांधी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रात सद्भावना स्थापित करण्याचा संकल्प आजच्या दिनी करु, अशी प्रतिज्ञा पटोले यांनी उपस्थितांना दिली.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजीव गांधी यांच्या अकाली निधानाने देशाचा मोठा तोटा झाला, त्यांनी संगणक क्रांती आणली, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३ टक्के सत्तेचा वाटा दिला. राजीव गांधी यांनी खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण केले. राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोपही करण्यात आले पण ज्यांनी त्यांच्यावर हे आरोप केले त्यांच्याशीही त्यांनी सूडभावना बाळगली नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय महत्वाचा आहे, हा विजय हीच राजीव गांधी यांना खरी श्रद्धांजली ठरेल.        

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, देशात व राज्यात महाविनाशी सत्ता आहे. कोल्हापूर विशालगड, संभाजीनगरमध्ये जे घडले ते पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सावध राहिले पाहिजे. सत्तेसाठी भाजपा दंगली घडवू शकते, नाशिकमध्ये परवाच दंगल घडवण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत महाविनाशी सरकार घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणावयाचे आहे. सत्तेतील पक्ष एकमेकांचे थोबाड फोडण्याची भाषा करत आहेत,उद्या ते एकमेकांचे कपडेही फाडतील, असेही ते म्हणाले.  

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राजीव गांधी व मुंबईचे वेगळे नाते आहे, त्यांचा जन्म तर मुंबईतील आहेच पण सरचिटणीसपदी असताना मुंबईत पदयात्रा काढणारे, मुंबईला १०० कोटी निधी देणारे ते पहिले नेते आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे जनक राजीव गांधी आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले, ते आरक्षण महाराष्ट्राने ५० टक्के केले. निवडणूक हरलो तरी चालेल पण देशातील १८ वर्षांच्या युवकांना मतदाना हक्क दिला. शिक्षण काही लोकांची मक्तेदारी राहू नये यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली.एससी,एसटी मागास समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणली.

षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, 

महिला काँग्रेस अध्यक्ष अलका लांबा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, CWC चे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, CWC चे विशेष निमंत्रित सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार खासदार व पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.   

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक CWC चे विशेष निमंत्रित सदस्य नसीम खान यांनी केले तर सुत्रसंचालन प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !