संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर यांचे निधन
◻️ सौ. जोर्वेकर यांचे सभापती म्हणून उल्लेखनीय काम - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | संगमनेर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनंदाताई बाळासाहेब जोर्वेकर (वय - ५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या वरंवडी गावच्या कन्या होत्या.
२०१७ मध्ये घुलेवाडी गणातून पंचायत समितीतून त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आणि २०२० मध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांची सभापती म्हणून निवड करून त्यांचा सन्मान केला. ही निवड सार्थ ठरवताना सुनंदाताई जोर्वेकर यांनी सातत्याने विकास कामे मार्गी लावत गोरगरिबांसाठी अनेक कामे केली. तालुका विस्ताराने मोठा असतानाही प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर जाऊन त्यांनी अडीअडचणी सोडवल्या.
शांत संयमी स्वभाव धार्मिक वृत्ती यामुळे त्या कायम महिलांमध्ये लोकप्रिय राहिल्या वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात पती बाळासाहेब जोर्वेकर, दोन मुले, सुना असा मोठा परिवार आहे त्यांच्या आपत्कालीन निधनाने संगमनेर तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
सौ. सुनंदाताई जोर्वेकर यांचे सभापती म्हणून उल्लेखनीय काम - बाळासाहेब थोरात
२०२०-२१ हा कोरोना काळ होता अशा परिस्थितीमध्ये सौ. जोर्वेकर यांनी सभापती म्हणून तालुक्याची जबाबदारी सांभाळताना अत्यंत उल्लेखनीय काम केले. कुटुंब सांभाळून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. शांत संयमी स्वभावाच्या सौ. सुनंदाताई जोर्वेकर यांचे निधन दुःखदायक असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार थोरात यांनी म्हटले आहे.