शासकीय वाळु वाहतूकीसाठी केलेला रस्ता शेतकऱ्यांच्या मुळावर?
◻️ आश्वी खुर्द गावचे सांडपाणी थेट शेतात दाखल
◻️ न्याय न मिळाल्यास शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा इशारा
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावच्या पश्चिमेस असलेल्या मज्जीद कब्रस्तान नजीक पाणंद ओढयात शासकिय वाळु काढण्यासाठी महसुल विभागाने ठेकेदारास हाताशी धरत रस्ता केला होता. यावेळी ओढ्याची शासकिय लांबी रुंदीचा ताळमेळ न घालता गावच्या सांडपाण्याच्या गटारीसह लगच्या शेतकऱ्याचें सुमारे १०० फळझाडे व उभ्या पिकात मुरुम टाकुण रस्ता करण्यात आला. त्यामुळे पावसाच्या पाण्यासह गावचे सांडपाणी विहिरीत झिरपल्याने पाणी दुषीत झाल्यामुळे शेतकऱ्यानी पत्रकाद्वारे हा प्रश्न निकाली काढण्याचे निवेदन दिले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आमच्या शेतालगत गावठाण हद आहे. यांच ठिकाणाहून पूर्वी पोई म्हणुन नाला होता. पुढे त्यालाचं पाणंद ओढा म्हणुन नाव पडले होते. या ओढ्याची लांबी - रुंदी खोली कुणालाही माहीत नाही. गावच्या काही मंडळीने मंडलाधिकारी, तलाठी तहसिलदार, महसुलातील इतर कर्मचारी यांनी शासकीय वाळु काढण्याच्या नावाखाली भूमी अभिलेख विभागाला पाचारण केले.
यानंतर तीन वेगवेगळ्या मोजण्या करण्यात आल्या. या तिन्ही ही मोजणीत तफावत आढळल्याने शेतकऱ्यानी हरकती नोंदवल्या. असे असताना ही प्रशासनाचा धाक दाखवत वाळू ठेकेदाराने गावच्या सांडपाण्याची गटार तोडली तसेच लगतच्या शेतकऱ्याचे सुमारे १०० फळझाडे तोडून उभ्या पिकात जेसीबी घातला. यानंतर ५०० डंपर मुरुम टाकूत रस्ता बनवण्यात आला आणि हजारो ब्रास वाळु काढण्यात आली.
शासकिय काम असल्याने स्थानिक शेतकऱ्यानी विरोध दर्शविला नाही. मात्र पावसाळा सुरू झाल्याने पावसाचे पाणी आणि गावच्या गटारीचे सांडपाणी थेट शेतकऱ्याच्या विहीरीत व शेतात उतरल्याने विहीरीचे पाणी दुषीत होत आहे. या पाण्यामुळे शेतातील उभे पिके सडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावंर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होऊ लागली आहे.
दरम्यान सांडपाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच फळझाडाचे नुकसान करणाऱ्या दोषी अघिकाऱ्यावंर पंधरा दिवसात कारवाई तसेच हद्दी खुना फिक्स करण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास कुटुंबासह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकरी देवराम गायकवाड, नानासाहेब गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अनिल गायकवाड, कादर सय्यद, मोसीन सय्यद, दगडु गायकवाड, गोविंद गायकवाड, इन्नुस सय्यद, गोविंद गायकवाड, सुभाष गायकवाड, विजय गायकवाड, सोमनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, मुसा सय्यद आदिनी दिला आहे. तसेच या निवेदनाची प्रत महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व शासकिय कार्यालयांना पाठवण्यात आली आहे.
गावचे सांडपाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी सन २०२२ साली ग्रामपंचायत कार्यालयासमोर उषोषण केल्यानंतर गटार करण्यात आली. मात्र वाळु ठेकेदाराने ती बंद करत माझ्या उभ्या पिकात जेसीबी घालून नुकसान केले. सध्या माझ्या उभ्या पिकात गावचे गटारीचे व पावसाचे पाणी शिरल्यामुळे विहीरीचे पाणी दुषीत झाले आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके नष्ट होत असल्याने कुटुबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने तात्काळ मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा कुटुबांसह आत्मदहन करण्याशिवाय पर्याय माझ्यासमोर राहणार नाही. अशी प्रतिक्रिया आश्वी खुर्द येथील बांधीत शेतकरी इन्नुस छन्नुमियॉ सय्यद यांनी दिली.