मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली बाळासाहेब थोराताची भेट
◻️ माकपला विधानसभेच्या १२ जागा सोडण्याची महाविकास आघाडीकडे मागणी
संगमनेर LIVE | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे भेट घेतली.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये किमान १२ जागा महाविकास आघाडीने सोडाव्यात, तसेच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरवत असताना त्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, श्रमिकांचे सर्व प्रमुख मुद्दे त्यामध्ये यावेत अशी मागणी केली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगली मदत केली. विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला या पार्श्वभूमीवर योग्यरीत्या सामावून घेतले जाईल, तसेच किमान समान कार्यक्रम व निवडणूक जाहीरनामा बनवण्याच्या प्रक्रियेतही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आग्रह प्राधान्याने विचारात घेतले जातील असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
राज्यात शेतकरी कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने श्रमिकांच्या या सर्व प्रश्नांबाबत नेटाने संघर्ष करत आहे. महाविकास आघाडीने ही या सर्व श्रमिकांच्या प्रश्नांमध्ये अधिक सजगतेने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे प्रश्न कशाप्रकारे सोडवले जातील याबद्दलही आघाडीच्या नेत्यांनी जनतेला आस्वस्थ करण्याची आवश्यकता आहे. माकपचे हे म्हणणे यावेळी शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मांडले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील विधानसभेच्या १) डहाणू (जि. पालघर), २) कळवण (जि. नाशिक), ३) सोलापूर, मध्य (जि. सोलापूर), ४) नाशिक, पश्चिम (जि. नाशिक), ५) अकोले (जि. अहमदनगर), ६) किनवट (जि. नांदेड), ७) पाथरी (जि. परभणी), ८) माजलगांव (जि. बीड), ९) दिंडोरी (जि. नाशिक), १०) इगतपुरी (जि. नाशिक), ११) विक्रमगड (जि. पालघर), १२) शहापूर (जि. ठाणे) या १२ जागांची मागणी केली आहे.
दरम्यान या शिष्टमंडळामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर, माजी आमदार व ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम मास्तर, कामगार नेते डॉ. डी. एल. कऱ्हाड व डॉ. अजित नवले यांचा समावेश होता.