महसूलमंत्री विखे पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात
◻️ मंत्र्याकडून जखमीची रुग्णालयात जाऊन विचारपूस
संगमनेर LIVE | शुक्रवारी रात्री संगमनेर हद्दीमध्ये राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात झाला. या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे हे जखमी झाले.
महसूलमंत्री विखे पाटील यांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्याची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. लोणी हून संगमनेरच्या दिशेना गाडी जात असताना कोल्हार - घोटी राज्य मार्गावर समनापुर येथील गणपती मंदिरानजीक हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
यावेळी झालेल्या अपघातात मोठी दुर्घटना टळली असली तरी, मंत्री विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना आधार दिला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा करत उपचाराबाबत निर्देश दिले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान महसूलमंत्र्यानी अपघात झालेल्या ठिकाणची पाहणी करून भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील संबंधीत विभागाला केल्या आहेत.