वारकरी सांप्रदयाचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज
◻️ कोल्हेवाडी येथील अखंड हरीनाम सप्ताहास मंत्री विखे पाटील यांची भेट
संगमनेर LIVE | अखंड हरीनाम सप्ताहाचे कार्यक्रम हिंदू धर्म आणि संस्कृतीचा संदेश देण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. वारकरी सांप्रदयाने जोपासलेला वारसा पुढे घेवून जाण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
कोल्हेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरीनाम सप्ताहास मंत्री विखे पाटील यांनी भेट दिली. ह.भ.प. उध्दव महाराज मंडलीक यांच्या किर्तनास उपस्थित राहून त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, विठुनामाचा जयघोष करीत लाखो वारकरी पंढरपूरला जातात. यामागे फक्त संतानी दिलेल्या विचारांची प्रेरणा आहे. हजारो वर्षांचा समृध्द वारसा आपल्या पाठीशी आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचे मोठे काम आशा अखंड हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने होत आहे.
आपल्या जिल्ह्याला संताचा मोठा वारसा आहे. जिल्ह्यातील तिर्थस्थान ही आपली अधिष्ठान असून त्यांची जपणूक करणे आपले कर्तव्य आहे. जिल्ह्यातील तिर्थस्थानांचा विकास करण्याचे काम सुरू झाले असून नेवासा येथे उभी राहणारी ज्ञानेश्वर सृष्टी जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्रात मानाचे स्थान ठरणार असून, यासाठी राज्य सरकार २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली.
श्रावण महीन्याचे औचित्य साधून प्रत्येक गावात सुरू असलेले अखंड हरीनाम सप्ताह समाजिक एकतेसाठी महत्वपूर्ण असून गावाचे गावपण टिकवून ठेवण्यासाठी अध्यात्मिक उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. ग्रामस्थांच्या वतीने ह.भ.प. उध्दव महाराज मंडलीक आणि मंत्री विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.