आश्वीतुन दुचाकी तर वरंवडी येथून पाणबुडी मोटर चोरीला
◻️ आश्वी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ ; पोलीसांच्या कामगिरीबाबत नाराजी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथून समीर गौतम मुन्तोडे यांची दुचाकी तर वरंवडी येथील शिवाजी रावजी दातीर यांची शेततळ्यातून इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार चोरी गेल्याची तक्रार आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आश्वी - दाढ रस्त्यावर गांधी कॉम्प्लेक्स असून समीर गौतम मुन्तोडे यांनी दुपारी ३ ते ४. २२ वाजे दरम्यान येथील पतसंस्थेत समोर होंडा कंपनीची शाईन ही दुचाकी (एम. एच. १७ बीए ६५०७) उभी केली होती. मात्र चोरट्यांने भर दुपारी ही दुचाकी चोरुन नेली. विशेष म्हणजे नेहमी हा परिसर गजबजलेला असताना दुचाकी चोरी झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर क्रमांक १४८/२०२४ नुसार भादंवी कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुचाकी १० हजार रुपये किंमतीची असल्याची माहिती मिळाली आहे.
दुसऱ्या एका घटनेत तालुक्यातील वरंवडी येथील शिवाजी रावजी दातीर यांच्या गट नंबर ८०/५ मध्ये असलेल्या शेततळ्यातून ६ हजार रुपये किमंतीची इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार चोरी गेली आहे. ही घटना देखील दुपारीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
२६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे दातीर यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रंजिस्टर क्रमांक १४९/२०२४ नुसार भादंवी कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आश्वी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पोलीस गस्तीचे प्रमाण नगण्य असल्याकारणाने पोलीसाचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून परिसरातील गावांमध्ये भुरट्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मागील अनेक चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने नागरीक पोलीसांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत नाराजी व्यक्त करत आहे.