बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी!
◻️ विधानसभा निवडणुकीपूर्वीचं महत्वाची जबाबदारी
संगमनेर LIVE | काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मा. प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्यपदी त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे व राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकार द्वारे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड जाहीर केली.
स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा लाभलेले आमदार बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी होत विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, जलसंधारण, रोहयो, खारजमीन, राजशिष्टाचार अशा आठ विभागांची जबाबदारी सांभाळताना या सर्व विभागांना लोकाभिमुख केले. महसूलमंत्री असताना ऑनलाईन ७/१२, ८/अ तसेच विद्यार्थ्यांना शाळेतच ८० लाख दाखले देण्याचा विक्रम केला होता. शिक्षणमंत्री काळात बेस्ट ऑफ फाईव्ह तर कृषी मंत्री काळात एक लाख शेततळ्यांची निर्मिती केली.
२०१८ मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्षाने गुजरात निवडणुकीची जबाबदारी सोपवली. यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले. यानंतर हिमाचल प्रदेशच्या निरीक्षकपदी ही आमदार थोरात यांनी काम केले. २०१९ मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर त्यांची निवड झाली होती. तर जुलै २०२९ मध्ये पक्ष अत्यंत अडचणीत असताना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी ४३ आमदार निवडून आणले. याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये मोलाचा वाटा उचलला.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महसूलमंत्रीपद सांभाळताना ई - पीक पाहणी सह शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. याच काळामध्ये निळवंडे कालव्यांना अत्यंत गती देताना कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाचे स्वप्न पूर्ण केले. राष्ट्रीय व राज्य पातळीवर काम करताना संगमनेर तालुका सर्वांगीण विकासातून राज्यात अग्रगण्य बनवला.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळताना महाविकास आघाडीला ३१ जागांवर मोठे यश मिळवून दिले. शांत, संयमी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून काँग्रेस पक्षामध्ये आमदार बाळासाहेब थोरांची अत्यंत लोकप्रिय असून विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
काँग्रेसच्या सर्वोच्च असलेल्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी आमदार थोरात यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, केसी वेनूगोपाल ,पी चिदंबरम, अशा राष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निवडीने संगमनेरच्या गौरव दिल्लीत झाला असून या निवडीने अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यानी मोठा जल्लोष साजरा केला आहे.