“तुझे आले का? माझे आले” हे शब्द ऐकता - ऐकता दिवस सरला!

संगमनेर Live
0
◻️ मुख्यमंत्री - लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या २७ लाख महिलांच्या खात्याला आधार सिडींग नाही

आज दिवसभर “तुझे आले का? माझे आले” हे शब्द ऐकता ऐकता दिवस सरला. गेल्या दीड महिन्यात कळस बुद्रुक पोस्टात आम्ही ३०० पेक्षा अधिक खाते उघडले. त्याला काळजीपूर्वक आधार सिडींग करून घेतले. यापैकी एकाही महिलेचे आधार सिडींग रिजेक्ट झाले नाही. म्हणजे आपल्या पोस्टात ओपन केलेल्या १०० टक्के खात्यांना यशस्वी आधार सिडींग झाले. त्यामुळे जे अर्ज अप्रूव्ह (स्वीकारले) गेले आणि ज्यांनी पोस्टाचा खाते नंबरला दिला त्या सर्व महिलांना पैसे आले आणि बाकीच्याचे देखील उद्यापर्यंत येतील.

तुम्ही म्हणाल दादा, हे आधार सिडींग काय आहे? तर बहिणींनो, आधार सिडींग म्हणजे तुम्ही शासनाला परवानगी देतात की माझ्या आधार सिडींग असलेल्या बँक किंवा पोस्ट बँक खात्यावर पैसे जमा करण्यास माझी सहमती आहे. तुम्ही फॉर्म भरताना कोणत्याही बँकेचा खाते नंबर दिला तरी तुमचे पैसे हे, ज्या बँकेला आधार सिडींग आहे तेथेच जमा होणार!

आधार लिंक आणि सिडींग यात गोंधळ करू नका. आपले आधार लिंक हे सगळ्या खात्यांना असू शकते पण आधार सिडींग हे फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी करता येते, आणि ज्या बँक खात्याला आधार सिडींग आहे तिथेच आपले पैसे जमा होतात. पी. एम. किसान योजना अनुदान, उज्ज्वला गॅस अनुदान, घरकुल अनुदान, शेतीची नुकसान भरपाई, पीक विम्याचे पैसे हे सगळं आधार सिडींग आलेल्या बँक खात्यातचं जमा होतं. आता ज्यांना माहित नाही त्यांना आधार सिडींग म्हणजे काय ते समजलं असेल.

आम्ही पोस्टात तुमचं काम सोप्प करतो. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते फक्त तुमचा मोबाईल आणि आधारकार्डच्या साहाय्याने ओपन करून त्याला तुम्हाला विचारून आधार सिडींग करून घेतो. ही पूर्ण प्रक्रिया पेपरलेस आहे, म्हणजे तुम्हाला कोणतंही झेरॉक्स किंवा फोटो द्यायची गरज नाही.

१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या १ कोटी ३५ लाख लाभार्थी महिलापैकी तब्बल २७ लाख महिलांच्या खात्याला आधार सिडींग नाही ही बाब समोर आली आहे. आता अशा महिलांसमोर दोन पर्याय आहेत. 

आपल्या कोणत्याही चालू बँक खात्याला आधार सिडींग करणे किंवा पोस्टात दोन मिनिटात पोस्ट पेमेंट बँकेचे आधार सिडींग केलेले खाते ओपन करणे. आधार सिडींगची विनंती केल्यावर साधारणतः सिडींगला ७२ तास लागतात. बऱ्याच वेळेस ते ४८ तासांच्या आतही होऊ शकते. 

शासनाचा पैसे पाठवणारा विभाग पेमेंट सायकल (Payment Cycle) रन करत असतो. जेंव्हा अशी सायकल रन होईल, त्या वेळी तुमचं आधार सिडींग खात्याला झालेलं असणं गरजेचं आहे आणि समजा आधार सिडींग त्यांनंतर झालं तर पैसे पुढच्या पेमेंट सायकल वेळी जमा होतील. त्यामुळे निश्चिन्त रहा.

ज्यांचे आधार सिडींग नाही त्यांनी अगदी शांततेने बँकेत किंवा पोस्टात आपल्या खात्याला आधार सिडींग करून घ्या.

सध्या जे तीन हजार रुपये खात्यावर जमा झालेले आहेत, ते ३१ जुलै पूर्वी ज्यांचे फॉर्म स्वीकारले गेले, त्यांचे जमा झालेले आहेत. ज्यांचे फॉर्म बाकी आहे त्यांनी काळजी करू नका, तुम्हाला पुढच्या वेळी ३ हप्ते जमा होतील. एकमेकांना मदत करा. जेणेकरून आपल्या गावांमधील महिलांना योजनेचा लाभ मिळेल.

पोस्टात ज्यांचे पैसे जमा झालेत त्यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज पडला नाही. त्यांनी ७७९९०२२५०९ या नंबरवर फोन करू शकता, म्हणजे शिल्लक रकमेचा मेसेज येईल किंवा पोस्टात येऊन चेक करू शकता.

आता इतक्या महिलांचे पैसे एकाच वेळी जमा झाल्यामुळे आमच्याकडे जरा कॅशचा तुटवडा आहे. खूपच अडचण असेल तर पैसे काढू शकता. जर तातडीची गरज नसेल तर पैसे खात्यावर ठेऊ शकता व वाट्टेल तेंव्हा काढू शकता. त्यावर २.५ टक्के व्याजदर आहे.

लक्षात घ्या, खात्यावर असलेले पैसे पुन्हा मागे जात नाहीत. तुम्हाला असं कोणी सांगत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तांत्रिक साक्षर असलेल्या महिला Ippb Mobile Banking हे पोस्ट बँकेचे अँप्लिकेशन डाउनलोड करून स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलवर हे पैसे वापरू शकतील. सदर खात्यावरून देशभरातील कोणत्याही पोस्टात व्यवहार करता येतात.

धन्यवाद! 

- लेखक विशाल कोल्हे हे अकोले तालुक्यातील कळस पोस्ट कार्यालयात पोस्ट मास्तर म्हणुन कार्यरत असून त्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

वाचकांनो काही शंका असल्यास किंवा लेख आवडल्यास लेखकाला संपर्क करुन प्रतिक्रिया नक्की नोंदवा - 7507031092 / ७५०७०३१०९२
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !