राहुल गांधीच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली - बाळासाहेब थोरात
◻️ महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न
◻️ बहुमत जाताच पंतप्रधान मोदींना धर्मनिरपेक्षतेची आठवण
संगमनेर LIVE (मुंबई) | लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे, महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत, या महिल्या खासदार भाजपा सरकारला धारेवर धरत आहेत. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच नरेंद्र मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे. असे काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला, या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अस्लम शेख, शिवसेना खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, शेकापचे जयंत पाटील, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे, राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सांगा. मविआच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला सांगा, असे थोरात म्हणाले.