अद्भुत नृत्याविष्काराने संगमनेरकर मंत्रमुग्ध!

संगमनेर Live
0
अद्भुत नृत्याविष्काराने संगमनेरकर मंत्रमुग्ध!

◻️ लायन्स सॅफ्रॉनच्या ‘जोश’साठी गर्दीचा उच्चांक

संगमनेर LIVE | भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन (सफायर) आयोजित स्वातंत्र्योत्सव या कार्यक्रमामध्ये ‘जोश द डान्स शो’ या अद्भुत नृत्याविष्काराने संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले. 

संगमनेरच्या मालपाणी लॉन्स येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात गर्दीचा नवीन उच्चांक बघायला मिळाला. या नृत्याविष्कारामध्ये मुंबई येथील आर. डी. डान्स ग्रुप, उरण - रायगड येथील जय हनुमान कला मंच, ध्रुव ग्लोबल स्कूल, स्ट्रॉबेरी स्कूल, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल, निडो स्कूल या डान्स ग्रुपने उपस्थितांची मने जिंकली. 

पॉपिंग, लॉकिंग, फ्रिस्टाईल, बाऊंस, क्रंपिंग, प्रेप आदी डान्स प्रकाराने उपस्थितांचे हृदयाचे ठोके चुकले देशभरात आपल्या नृत्याविष्काराने मोहनी घालणाऱ्या आर. डी. डान्स ग्रुप आणि जय हनुमान कला मंच यांच्या सादरीकरणामुळे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे नृत्य स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला सादर करण्यात आले.

मालपाणी उद्योग समूहाचे संचालक उद्योजक मनिष मालपाणी, राजेश मालपाणी, स्ट्रॉबेरी इंग्लिश मेडियम स्कूलच्या संचालिका संज्योत वैद्य, लायन्स सॅफ्रॉनचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष स्वाती मालपाणी, सेक्रेटरी प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा, झोन चेअरपर्सन सीए प्रशांत रूणवाल आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 

क्रांतीची मशाल पेटवून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी मनिष मालपाणी यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे महत्व विषद करून येणाऱ्या तरूण पिढीवरच भारत आर्थिक महासत्ता होणार असल्याचे सांगितले. जीडीपीचा विचार केला तर संपूर्ण जगामध्ये भारत पाचव्या क्रमांकावर असून तरूणांनी स्टार्टअप आणि उद्योजकतेकडे वळाले पाहिजे असे मनिष मालपाणी म्हटले. अतिथी संज्योत वैद्य यांनी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांची आठवण करत ‘ऐ मेरे वतन लोगो’ गाण्याचे सादरीकरण केले.

क्लबचे अध्यक्ष गिरीश मालपाणी यांच्यामुळे संगमनेरच्या जनतेला सांस्कृतिक मेजवाणी मिळते असेही त्या म्हणाल्या. प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी यांनी २० वर्षांपासून संगमनेर सॅफ्रॉन स्वातंत्र्योत्सव उपक्रम राबवित असून मनींदरजितसिंग बिट्टा, आफळे महाराज, राहुल सोलापूरकर, डॉ. संजय मालपाणी आदी वक्त्यांनी आपली व्याख्याने दिली असल्याचे सांगितले. 

प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. देशप्रेमाची धगधगती ज्वाला तेवत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नृत्याविषयी नियोजन करणाऱ्या कुलदीप कागडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

गणपती डान्स, वंदे मातरम, कमांडो, शिवाजी महाराज, साईबाबा, महाभारत, कृष्ण, बॉलिवूड स्टाईल आदी नृत्याने संगमनेरकर गहिवरले. सुंदर सादरीकरण करणाऱ्या सर्वच डान्स ग्रुपचा सत्कार आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्यावेळी उपस्थित जनसमुदायाने मोबाईल टॉर्च लावून शहिदांना मानवंदना दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. श्रीहरी पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्व लायन्स सॅफ्रॉन सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !