मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील नोंदणी करीता अधिक काम करण्याचा निर्धार
◻️ संगमनेर येथे समितीची पहीली बैठक संपन्न
◻️ तालुक्यातील ८० हजार महीलांचे योजनेसाठी अर्ज दाखल
संगमनेर LIVE | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुका स्तरावरील अशासकीय सदस्यांच्या समितीची पहीली बैठक संपन्न झाली असून तालुक्यातील उर्वरित महीलांना योजनेचा लाभ देण्यासाठी येणाऱ्या त्रृटी दूर करून शासकीय यंत्रणेने कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी करीता तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून संगमनेर विधानसभा समितीच्या अध्यक्ष पदावर शरद गोर्डे आणि समिती सदस्य म्हणून रऊफ शेख, अतुल कासट यांची निवड झाली आहे.
समितीची बैठक तहसिलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीला समितीचे शासकीय सदस्य मुख्याधिकारी राहूल वाघ यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष शरद गोर्डे यांच्यासह सदस्याचा तहसिलदार धीरज मांजरे यांनी सत्कार करून त्यांचे स्वागत केले.
योजना सुरू झाल्यापासून केलेल्या कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. आता पर्यत ८० हजार महीलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अन्य राहीलेल्या महीलांचे अर्ज दाखल करण्यासाठी शासन स्तरावरून कार्यवाही अधिक गतीमान करण्याचा निर्णय बैठकीत करण्यात आला.
अर्ज दाखल करताना येत असलेल्या त्रृटी तसेच काही कारणाने अर्ज स्विकारले जात नसले तरी अर्जातील चुका दुरूरस्त करून महीलांना सहकार्य करण्याबाबत बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला असुन सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ व मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत उर्वरित महिला लाभार्थी यांसाठी तालुक्यातील सर्व गावांमध्ये शासकीय यंत्रनेमार्फत शिबिर आयोजित करणार असल्याचे अध्यक्ष शरद गोर्डे यांनी सांगितले.
दरम्यान योजनेची अंमलबजावणी यशस्वी सुरू असून तहसिलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी नागणे आणि मुख्याधिकारी राहूल वाघ यांनी योजना प्रत्येक गावात आणि महीलांपर्यत पोहचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीमुळे संगमनेर तालुका नगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे समितीचे अध्यक्ष शरद गोर्डे यांनी सांगितले.