आश्वी परिसरातील मटका पिढ्या आणि जुगार अड्डयाना अभय कोणाचे?
◻️ अवैध धंद्याकडे कानाडोळा कशासाठी?
संगमनेर LIVE (आश्वी) | कायद्याने मटक्यावर बंदी असतानाही संगमनेर तालुक्यातील आश्वी आणि परिसरातील काही गावांमध्ये मटक्याबरोबरचं जुगार अड्डे देखील जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व अवैध धंदे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरू आहेत. सर्व सामान्य नागरिकांनवर कायद्याचा धाक निर्माण करणारे पोलीस मात्र या अवैध धंद्याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागत असून गोर गरीबांच्या खिशातले पैसे मटका व जुगार अड्डे चालवणाऱ्याकडून ओरबाडले जात असल्याने सर्व सामान्य नागरीक नाराजी व्यक्त करत आहे.
मटक्याप्रमाणेचं पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये खुलेआमपणे वर्दळीच्या ठिकाणी जुगार सुरु आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकाना नाहक त्रास सहन करावा लागतो. पण हा सगळा प्रकार पोलीसांच्या नाकासमोर सुरु असताना ते नेमका कानाडोळा का करतात? याबाबत स्थानिक नागरीकांमध्ये मटका आणि जुगार अड्डयाना अभय नेमके कोणाचे याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
त्यामुळे मटका व जुगार अड्ड्यावर कारवाई करुन? पोलीस नागरीकांमध्ये सुरू असलेल्या या चर्चाना पुर्णविराम देण्यासाठी कारवाई करणार का? याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आश्वी परिसरात पोलीसाची मलिन होत चाललेली प्रतिमा सुधारण्यासाठी संगमनेरच्या उप अधिक्षकासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
दोन ते महिन्यातून एकदा नगर एलसीबीचे कर्मचारी हे खाजगी वाहनाने आश्वी येथील मटका पिढ्या सुरू असलेल्या ठिकाणी येतात अशी चर्चा आहे. त्यानंतर मात्र पुन्हा नव्या जोमाने मटका पिढ्या सुरु राहतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना अनेक प्रश्न पडू लागले आहेत.