गणेशमूर्ती रंगभरण स्पर्धेत ५०० बाळगोपाळांनी लुटला मनसोक्त आनंद

संगमनेर Live
0
गणेशमूर्ती रंगभरण स्पर्धेत ५०० बाळगोपाळांनी लुटला मनसोक्त आनंद

◻️ लायन्स सॅफ्रॉनचा पर्यावरणपूरक उपक्रम समाजासाठी दिशादर्शक - गिरीश मालपाणी

संगमनेर LIVE | लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन (सफायर) आयोजित शाडू मातीच्या गणेशमूर्ती रंगभरण स्पर्धेमध्ये संगमनेरमधील ५०० बालगोपाळ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या चिमुकल्यांसाठी ही स्पर्धा आनंद आणि उत्साह देणारी ठरली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉनचे संस्थापक अध्यक्ष व माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन गिरीश मालपाणी उपस्थित होते. व्यासपीठावर लायन्स सॅफ्रॉनचे माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, सुनिता मालपाणी, अध्यक्ष स्वाती मालपाणी, सचिव प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा हे उपस्थित होते. 

गेल्या दहा वर्षांपासून राबवित असलेल्या लायन्स सफायरचा पर्यावरणपूरक उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असल्याचे मत मालपाणी यांनी व्यक्त केले. प्रकल्प प्रमुख देविदास गोरे, सुदीप हासे, प्रशांत गुंजाळ, कल्याण कासट, अतुल अभंग, आर. आर. मालपाणी यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. स्पर्धेचे परिक्षण योगेश उपासनी, दिलीप वाकचौरे यांनी केले. शिक्षणाबरोबरच अवांतर स्पर्धा, कला, क्रीडा याचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न झाले पाहिजे असे मत यावेळी गिरीश मालपाणी यांनी व्यक्त केले.

यावर्षी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. ४०० प्रवेश ठरलेले असतानाही ५०० गणेश मूर्ती आयोजकांनी उपलब्ध करून दिल्या. उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला. शाडू मातीच्या या सुबक मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार योगेश उपासनी यांनी उपलब्ध करून दिल्या. संगमनेर मधील सर्वच शाळांनी या स्पर्धेत भाग नोंदविला. संगमनेरमधील कलाशिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. 

पहिली ते पाचवी गटामध्ये प्रथम क्रमांक विघ्नेशराजे आहेर, द्वितीय क्रमांक सई मेहेत्रे (अमृतवाहिनी विद्यालय), तृतीय क्रमांक राधेश्याम जोर्वेकर (मालपाणी विद्यालय) चतुर्थ क्रमांक दिव्या डागा यांनी यश मिळविले. सहावी ते दहावी गटामध्ये प्रथम क्रमांक अनुष्का आहोळ, द्वितीय क्रमांक स्वाती जोर्वेकर (सह्याद्री विद्यालय), तृतीय क्रमांक आरव कासट (डेरे विद्यालय), चतुर्थ क्रमांक अन्वी शिंदे (ध्रुव स्कुल) यांनी यश मिळविले. 

एकूण २२ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. बक्षिस वितरण झाल्यानंतर सर्व स्पर्धकांना गणेशमूर्ती भेट म्हणून देण्यात आल्या. विद्यार्थी या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आपआपल्या घरी भक्तीभावाने करणार आहेत. पुढील वर्षी अधिक जोमाने ही स्पर्धा आयोजित करणार असल्याचे प्रकल्प प्रमुख देविदास गोरे, सुदीप हासे यांनी सांगितले.

दरम्यान या पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली गणेशमूर्ती सजावट व रंगभरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी देवीदास गोरे, सुदीप हासे, प्रशांत गुंजाळ, कल्याण कासट, आर. आर. मालपाणी, शुभम तवरेज, संतोष अभंग, डॉ. अमोल वालझाडे, कल्पेश मर्दा, प्रशांत रहाणे, विशाल थोरात, एस.एम.मोरे यांच्याबरोबरच सर्व क्लब सदस्यांनी विशेष प्रयत्न घेतले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !