उंबरी बाळापूर येथील स्ट्रीट लाईटचे १८ हजाराचे दिवे चोरट्यांनी लांबवले
◻️ आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; १७ पैकी ७ पोल तोडून केली चोरी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर गावात नुकतेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ओझर रस्त्यावरील प्रवरा कालव्यालगत १७ हायमॅक्स दिवे बसवले होते. या १७ दिव्यापैकी ७ हायमॅक्सचे पोल अज्ञात व्यक्तीने तोडून वाकवले आणि त्यावरील ७ एलइडी लाईट चोरुन नेले. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उंबरी बाळापूर येथे ३० ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उंबरी बाळापुर ते ओझर रस्त्यावरील प्रवरा डाव्या कालव्या लगत १७ हायमॅक्स दिवे बसवण्यात आले होते.
दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी हायमॅक्सचे पोल तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. ही माहिती संजय भुसाळ यांनी फोनवरून सरपंच अर्चना भुसाळ यांना कळवली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहिले असता १७ पैकी ७ हायमॅक्स पोल अज्ञात व्यक्तीने तोडून वाकवले आणि त्यावरील ७ एलइडी लाईट चोरुन नेल्याचे लक्षात आले.
दरम्यान ग्रामसेवक संग्राम तांबे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करताना ७ हायमॅक्स पोल तोडून वाकवत नुकसान केले आणि १८ हजार २०० रुपये किंमतीचे ७ एलइडी लाईट अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.