कॉम्रेड सिताराम येचुरी यांना सर्वपक्षीय आदरांजली
◻️ अकोले येथील माकप कार्यालयामध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन
संगमनेर LIVE (अकोले) | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी यांना अकोले येथील माकप कार्यालयामध्ये सर्वपक्षीय नेतृत्वाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अकोले तालुका नेहमीच जाती, धर्म, प्रांतांच्या पलीकडे जात, मानवतेला प्राधान्य देणारा तालुका राहिला आहे. त्यामुळेच पक्षभेद विसरून चांगल्याला चांगले म्हणत एकमेकांच्या सुख दुःखामध्ये भागीदारी करण्याची परंपरा तालुक्यात टिकून आहे.
कॉम्रेड सिताराम येचूरी यांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमात याची पुन्हा प्रचिती आली. पक्षभेद विसरून तालुक्यातील बहुतांश नेते, कार्यकर्ते व श्रमिक जनता कॉम्रेड येचुरी यांच्या आदरांजली सभेसाठी एकत्र आले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड कारभारी उगले होते. शाहीर तुळशीराम जाधव यांनी क्रांती गीत सादर करून सभेची सुरुवात केली. कॉम्रेड सिताराम येचुरी अंतिम श्वासापर्यंत श्रमिक, शेतकरी, कामगारांच्या हितासाठी जगले.
भारतात लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता या मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींच्या विरोधात आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला. आज जेव्हा देशाचे संविधान व लोकशाही काही शक्तींकडून धोक्यात आणली गेली आहे, त्या अत्यंत कसोटीच्या काळात कॉम्रेड सीताराम यांचे जाणे देशाला आणि देशातील जनतेला परवडण्यासारखे नाही अशा प्रकारच्या भावना यावेळी उपस्थित करण्यात आल्या.
कॉम्रेड येचुरी यांनी दिलेला विचार पुढे घेऊन जात, श्रमिक कष्टकऱ्यांची एकजूट आणि लढे, यशस्वी करण्यासाठी कटिबद्धता यावेळी व्यक्त करण्यात आली.
भारत, विविध पूजा पद्धती, धर्म, जाती, परंपरा, भाषा व प्रांतांनी बनलेला देश आहे. या सर्व विविधतेमध्ये सर्वांना लोकशाही अधिकार देत सामावून घेणारी घटना देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रदीर्घ विचार मंथनातून स्वीकारण्यात आली आहे. काही शक्तींना देशातील ही एकता मान्य नाही. सबंध देशात एक धर्म, एक चालक, एक भाषा, असा एकारलेपणा त्यांना हवा आहे. त्या शक्ती त्यामुळेच विविधतेत एकता मानणाऱ्या 'आयडिया ऑफ इंडिया' ला आव्हान देत आहेत.
कॉम्रेड सिताराम येचुरी मात्र आयुष्यभर विविधतेतील एकतेला, लोकशाही अधिकार बहाल करत, विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या बाजूने लढत राहिले. अकोल्याची भूमी सुद्धा अशाच प्रकारे आदिवासी-बिगर आदिवासी, दलित- बिगर दलित, सर्वांना एकत्र घेऊन जाणारी भूमी आहे. देशाची ही विविधतेतील एकता व तालुक्याची सुद्धा ही विविधतेतील एकता प्राणपणाने जपणे हेच कॉम्रेड सिताराम यांना अभिवादन असेल अशा भावना यावेळी व त्यांनी व्यक्त केल्या.
आ. डॉ. किरण लहामटे, मधुकर नवले, डॉ. अजित नवले, विनय सावंत, महेश नवले, मधुकर तळपाडे, मच्छिंद्र धुमाळ, शांताराम गजे, विठ्ठल शेवाळे, वसंत मनकर, डॉ. संदीप कडलग, संतोष मुर्तडक, स्वप्निल धांडे, चंद्रमोहन निरगुडे, शिवाजी नेहे, शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे, माधवराव तीटमे, आर.डी. चौधरी,
विलास नवले, लक्ष्मण नवले, सुरेश नवले, मंदाबाई नवले, आनंदा नवले, ओमकार नवाळी, सागर शिंदे, सुरेश गडाख, सुरेश खांडगे, रवींद्र पवार, डॉ.भाऊराव उघडे, लक्ष्मण नवले, विनोद हांडे, अरुणराव रुपवते, प्राध्यापक भगत सर, शाहिद भाई फारुकी, नामदेव भांगरे, संगीता साळवे, तुळशीराम कातोरे, एकनाथ मेंगाळ, गणेश ताजने आदींनी आदरांजली वाहिली.
दरम्यान कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी प्रास्ताविक करून सभेचे सूत्रसंचालन केले.