बारमाही आढळासाठी ग्रामपंचायती सरसावल्या!

संगमनेर Live
0
बारमाही आढळासाठी ग्रामपंचायती सरसावल्या!

◻️ गणोरे येथे पंचक्रोशीतील नागरिकांची बैठक संपन्न

संगमनेर LIVE | आढळा खोरे बारमाही व समृद्ध व्हावे यासाठी सुरू केलेल्या अभियानांतर्गत आज गणोरे येथे, गणोरे, हिवरगाव व पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. 

चला जाणूया नदीला, या शासकीय उपक्रमांतर्गत कार्यरत असलेले व जलबिरादरी या संस्थेबरोबर काम करत असलेले, प्रा. विठ्ठल शेवाळे यांनी आढळा खोरे समृद्ध करण्याबद्दल कार्यक्रम बैठकीसमोर ठेवला. चला जाणूया नदीला या अंतर्गत काम करणारे सुभाष देशमुख, नारायण उगले, संदीप वाकचौरे यावेळी उपस्थित होते.

किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी अकोले तालुक्यातील विविध खोऱ्यांची जल परिस्थिती मांडत आढाळा खोऱ्यात करावयाच्या जलसंधारण व जल संचयाच्या संदर्भामध्ये मांडणी केली.

आढळा खोऱ्यात पाण्याची आवक वाढावी यासाठी दारणा खोऱ्यात वाहून जाणारे पाणी आढळा खोऱ्याकडे वळवण्याची योजना कार्यान्वित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. 

बिताका वळण चर दुरुस्त करून या वळण चराचे पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाते त्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई देत, त्यांच्या शेतातून भूमिगत पाईप टाकून हे पाणी आढळा खोऱ्यात आणता येऊ शकते. जमिनीचे नुकसान टाळण्यासाठी भूमिगत पाईप टाकून हे पाणी आढळा खोऱ्यात आणावे यासाठी याबाबत अभ्यास होण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.

पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी इतरत्र वाहून जाणारे ५० एम.सी.एफ.टी. पाणी किरकोळ बांधबंधिस्ती करून आढळा खोऱ्यात वळवता येऊ शकते याबाबतही सजगतेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

खिरविरे वळण चर कार्यान्वित करून येथे पडणारे पाणी आढळेच्या तुटीच्या क्षेत्रात वळविण्याची आवश्यकता असून आढळा खोऱ्याच्या नदीपात्र व चरपात्रांमध्ये वाढलेली झुडपे साफ करून नदीतील सर्व प्रकारचे प्रदूषण दूर करण्यासाठी पावले टाकणे गरजेचे असल्याचे मत मांडले.

आढळचे खोरे तुटीचे खोरे असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब उपयोगात आणण्यासाठी रास्त व शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. 

परिसरातील अनेक ध्येयवादी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चर, बंधारे, पाझर तलाव व जलसंधारणाच्या विविध कामांच्या माध्यमातून या कामाला सुरुवात केली आहे. या ध्येयवादी कार्यकर्त्यांना बळ देण्याची आवश्यकता आहे. 

आढळा धरण, आढळा नदीपात्र, एकूण परिसरातील आठ के.टी. वेअर्स, परिसरातील सर्व पाझर तलाव, यांच्यातील गाळ, कचरा, दगड, मुरूम इत्यादी गोष्टी काढून टाकून या सर्वांची शास्त्रीय पद्धतीने सफाई करण्याची आवश्यकता आहे. आढळेच्या चाऱ्या दुरुस्त करून पाण्याचे होणारे नुकसान थांबविणे आवश्यक असलेल्याचे सांगितले.

चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत व आढळा बारमाही कृती समितीच्या माध्यमातून या सर्व कार्याला गती देण्यात आली असून समशेरपुर व देवठाण पाठोपाठ आज गणोरे येथे बैठक घेऊन परिसरातील सर्व सरपंच, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व जागरूक शेतकऱ्यांना संघटित करून या विधायक कार्यासाठी सर्वांनी कामाला लागावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावात जलसंधारणाच्या दृष्टिकोनातून व वृक्ष लागवडीच्या दृष्टिकोनातून काय करता येईल याचा कृती आराखडा तयार करून तो समितीला सादर करावा असे आवाहन या बैठकीमधून करण्यात येत आहे. आवाहनाला रास्त प्रतिसाद मिळत असून समशेरपुरचे ग्रामपंचायत एकनाथ मेंगाळ यांच्या पुढाकाराने व परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांच्या मदतीने आदिवासी भागातील विविध ग्रामपंचायतींचे असे कृती आराखडे तयार होत आहेत. 

समशेरपुर येथे झालेल्या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात, गावचे जलसंपदा संचय व नियोजनाचे आराखडे तयार केले आहेत.

देवठाण येथे कॉम्रेड तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड आदी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीमध्ये देवठाण व परिसरातील क्षेत्रामध्ये जलसंपदा संचय व विनियोगाचा आराखडा तयार होत आहे.

आज झालेल्या बैठकीत गणोरे व हिवरगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या कामी पुढाकार घेतला असून हे काम अविरत सुरू ठेवत या विविध ग्रामपंचायतींच्या आराखड्याच्या आधारे आढळा खोऱ्याचा अभ्यास पूर्ण आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी अहमदनगर यांना सादर करण्यात येणार आहे.

आज झालेल्या बैठकीसाठी गणोरे, हिवरगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी नामदेव (संत) आंबरे यांनी पुढाकार घेतला. यावेळी संतोष आंबरे,अशोक आंबरे, गणपत दातीर, प्रताप आंबरे, सुशांत आरोटे, बाळासाहेब संपत आंबरे, भाऊसाहेब आंबरे, दिलीप आंबरे, मच्छिंद्र सोनवणे, दशरथ उगले, अमोल उगले, संजय वाकचौरे उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !