बडोद्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारले जाणार
◻️ संकल्पभुमी स्मारकासाठी १० कोटीचा निधी देऊ - नामदार रामदास आठवले
संगमनेर LIVE (बडोदा) | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा संस्थानातील नोकरी सोडल्यानंतर २३ सप्टेंबर १९१७ रोजी सयाजी गार्डन मधील वृक्षाखाली बसुन अस्पृश्यता निवारणाचा संकल्प केला होता.
समाजाला न्याय हक्क मिळवुन देण्याबरोबरच समजात समता स्थापन करण्याचा संकल्प केला होता. त्या ऐतिहासीक स्थळाला संकल्प भुमी म्हणून आंबेडकरी जनता दरवर्षी नतमस्तक होते. बडोद्यातील सयाजी गार्डन मधील या संकल्पभुमिला दरवर्षी २३ सप्टेंबरला देशभरातुन आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने अभिवादनासाठी एकत्र येतात
या संकल्प भुमीला १०७ वर्ष झाली असून संकल्प भुमी ही देशभरातील आंबेडकरी जनतेसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे संकल्प भूमी जवळ गुजरात राज्य सरकारच्या वतीने महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक २७ कोटी खर्च करुन उभारण्यात येत आहे. येत्या डिसेंबर पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल.
या स्मारकात लाईट आणि म्युझीक शो सुरु करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने १० कोटीचा निधी मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री आठवले यांनी दिली. तसेच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनाही आपण या स्मारकासाठी १० कोटीचा निधी देण्यासाठी पत्र पाठवणार असल्याचे सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या पुढाकारातून संकल्प भूमीला भेट देण्यास आलेल्या आंबेडकरी अनुयायांना मोफत अन्नदान करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे गुजरात अध्यक्ष अशोककुमार भट्टी, प्रभारी जतीन भुट्टा, लीलावतीबेन वाघेला, बडोदा जिल्हा अध्यक्ष राजेश गोयल आदि यावेळी उपस्थित होते.