शिबलापूर येथे बिबट्याच्या थरारक झुंजीत मादी बिबट्याचा मृत्यू!
◻️ बिबट्याच्या दहशतीमुळे म्हस्के कुटुंबाने रात्र काढली जागुन
◻️ भिगी बिल्ली म्हणवणाऱ्या मावशीमुळे झाली वाघाची शिकार?
संगमनेर LIVE | शिकारीवरुन दोन मादी बिबट्यामध्ये झालेल्या वादातून एका मादी बिबट्याला प्राण गमवावे लागले आहेत. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारातील म्हस्के वस्तीवर बुधवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावळेराम शिवराम म्हस्के यांचे शिबलापुर गुहा रस्त्यानजीक राहते घर आहे. घरालगत ४१४ या गट नंबर मध्ये कपाशीचे पीक आहे. बुधवार दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन बिबट्या मध्ये झुंज चालू असलेल्याने मोठ्याने ओरडण्याचा व गुरगुरण्याचा आवाज येत होता. त्यामुळे घाबरलेल्या म्हस्के कुटुंबाने फटाके फोडले, त्यामुळे सुमारे तासभरानतंर बिबट्याचां आवाज येणे बंद झाले. मात्र, भितीपोटी म्हस्के कुटुंबाला झोप न लागल्यामुळे रात्र जागुन काढावी लागली.
गुरूवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी प्रमिला मांढरे या शेतात चारा आणण्यासाठी चालल्या होत्या. कपाशीच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने प्रमिला यांनी शेतमालक सावळेराम म्हस्के यांना याबाबत माहिती दिली. म्हस्के यांनी तात्काळ संरपच प्रमोद बोंद्रे व पत्रकार योगेश रातडीया यांना कळविल्यानंतर त्यानी वन अधिकारी सुहास उपासनी व हरिचंद्र जोजार यांना या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी यांनी घटना स्थळी येवून घटनेचा पंचनामा करत मादी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर संगमनेर खुर्द येथे या मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
परिसरात आणखी बिबटे असण्याची शकतात असल्याने शेतकऱ्यांनी रात्री - बेरात्री शेतात जाऊ नये. अगदी पर्याय नसल्यास हातात काठी व बॅटरी घेऊनचं जावे असे आवाहन वन विभागाचे सुहास उपासनी यांनी केले.
दरम्यान मृत बिबट्या आढळल्याने मोठी दहशत निर्माण झाल्यामुळे या परिसरात पिंजरा लावुन बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी नंदु म्हस्के, सावळेराम म्हस्के, राजेंद्र म्हस्के, संजय मांढरे, भीमराज म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, रवींद्र म्हस्के आदींसह परिसरातील शेतकरी आणि नागरीकांनी केली आहे. तर परिसरात तीन पिंजरे लावण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
भिगी बिल्ली म्हणवणाऱ्या मावशीमुळे वाघाची (बिबट्याची) शिकार?
कुणी तिला भिगी बिल्ली तर कुणी तिला वाघाची मावशी म्हणतं. परंतु ती भिगी बिल्ली नाही तर वाघाची मावशी असल्याची आपल्या सर्वाची लहानपणापासून ठाम समजूत आहे. अशातचं नुकतीचं अचंबित करणारी चर्चा कानावर आली आहे. यामध्ये शिबलापूर शिवारात दोन मादी बिबट्याची झुंज ही शिकारीसाठी झाली व एक बिबट्याचा यामध्ये मृत्यू झाला. परंतु एका मांजरीची शिकार करण्यासाठी झुंज झाल्यामुळे मावशीकडून वाघाची (बिबट्याची) शिकार झाल्याचा हास्यविनोद समाज माध्यमात पाहयला मिळत आहे.