ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार - जिल्हाधिकारी

संगमनेर Live
0
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार - जिल्हाधिकारी

◻️ ज्येष्ठ नागरिकांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी साजरा केला वाढदिवस

संगमनेर LIVE (अहमदनगर) | ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

कै. भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे एकत्र कुटुंब पद्धती लयास चालली आहे. आई - वडील आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना वाढवितात, त्यांना चांगल्या शिक्षणाच्या सुविधा देतात. समाजामध्ये आपल्या पायावर उभे राहून मानाने जगण्याइतपत बळ त्यांच्यात निर्माण करतात. परंतु याच   आई - वडिलांना त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. स्वेच्छेने वृद्धाश्रमात येणाऱ्या ज्येष्ठांची संख्या खूपच कमी आहे. समाजातील हे चित्र वेदनादायी आहे.

शिक्षण घेऊन आपला, आपल्या बुद्धीचा विकास होणे अपेक्षित आहे. परंतु उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झालेल्या व आपल्या आई - वडिलांच्या शेवटच्याक्षणी सुद्धा सोबत नसणाऱ्या पाल्यांच्या अनेक घटना आज विविध माध्यमे आणि समाज माध्यमातून आपण पाहतो. आई - वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या या पाल्यांच्या जीवनाला कुठलाच अर्थ नसून आपल्या आई - वडिलांचा सांभाळ करणे हे प्रत्येक मुला - मुलीचे कर्तव्य आहे. त्यांनी आपल्या आई, वडीलांचा सांभाळ केल्यास, त्यांची काळजी घेतल्यास या समाजामध्ये वृद्धाश्रमाची गरजच भासणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात, तसेच कायद्याचीही निर्मितीही केली आहे. ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्ह्यात योजनांची व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले.

प्रास्ताविकात सहायक आयुक्त देवढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत समन्वय साधण्यात येतो. वृद्धांची हेळसांड थांबून त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी शासनामार्फत वृद्धाश्रम सुरू करण्यास परवानगी देण्याबरोबरच अनुदानही देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ज्येष्ठ नागरिकांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी साजरा केला वाढदिवस....

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा १ ऑक्टोबर हा वाढदिवस. वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक व उपस्थितांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना शुभेच्छा दिल्या. आजच्या वाढदिवशी समाजाचे मार्गदर्शक असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद लाभले, ही माझ्यासाठी खूप भाग्याची बाब असल्याचे सांगत सर्व ज्येष्ठ नागरिकांचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी ऋणही व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या आरोग्य विभाग, विविध संघटना, व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची बुथ हॉस्पीटलतर्फे तपासणीही करण्यात आली.

दरम्यान या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक  उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !