श्वेतकुष्ठ उपचार मिळणार नाममात्र शुल्कात!
◻️ नगर येथे फोटोथेरेपी केंद्राचे शुक्रवारी लोकार्पण
संगमनेर LIVE (अहमदनगर) | श्वेतकुष्ठ, कोड त्वचेवरील पांढरे डाग किंवा किलास या त्वचा आजारावरील उपचार अहमदनगर मध्ये नाममात्र शुल्कात उपलब्ध होत आहेत. गरीब आणि गरजू रुग्णांना फोटोथेरपी उपचार अत्यल्प परवडणाऱ्या शुल्कात मिळावेत, यासाठी पुणे येथील श्वेता असोसिएशन, स्नेहालय आणि येथील सर्व त्वचा रोग तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने हे अद्ययावत फोटोथेरपी केंद्र निर्माण करण्यात आले आहे.
येत्या शुक्रवारी, दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. शंकर केशव आडकर संकुल, लेंडकर मळा, बालिकाश्रम रस्ता, अहमदनगर येथे उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम होत आहे.
श्वेता असोसिएशनच्या संस्थापिका आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. माया तुळपुळे या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने फोटोथेरपी सेंटर, व्हीटीलॅगो सपोर्ट ग्रुप , विवाह जुळणी केंद्र इत्यादी उपक्रम राबवित आहेत. अहमदनगर मध्ये सर्व त्वचारोग तज्ञ आणि स्नेहालय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने असेच एक केंद्र सुरू व्हावे, असा मागील दोन वर्षांपासूनचा प्रयत्न होता.
नगर शहर, नगर तालुका, पारनेर, राहुरी, कर्जत, जामखेड, पाथर्डी इत्यादी तालुक्यातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या अडचणींचा, खर्चाचा साकल्याने विचार केला. तारकपूर आणि माळीवाडा बस स्थानकाला मध्यवर्ती जवळ असणाऱ्या बालिकाश्रम रस्त्यावरील डॉक्टर आडकर संकुलात हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक डर्मा इंडिया कंपनीचे फोटोथेरेपी मशीन नगर मधील प्रतिसाद केंद्रात बसविण्यात आले या केंद्रास केअरिंग फ्रेंड्स हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर संचलित श्वेता फोटोथेरपी केंद्र असे नाव देण्यात आले आहे.
यावेळी उपस्थितीचे आवाहन प्रकल्पाच्या समन्वयक सौ.
पुनम रासने, स्नेहालय परिवारातील श्रीमती जया जोगदंड, डॉ. अंशू मुळे, डॉ. शेहनाज शेख, डॉ. स्वाती घूले, डॉ. प्रीती भोंबे, गीता कौर आदींनी केले आहे.