केंद्र आणि राज्य सरकार आदिवासी व बहुजन विरोधी - बाळासाहेब थोरात
◻️ कोळवाडे येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त आदिवासी मेळावा
संगमनेर LIVE | देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला बसावी हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वप्न होते. याकरता काँग्रेसने वंचित बहुजन आदिवासींच्या विकासासाठी कायम काम केले. मात्र मणिपूर मधील आदिवासी महिलांवर अत्याचार, राम मंदिर व नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला महामहिम राष्ट्रपती महोदयांना न बोलवणे या विचारांचे लोक सत्तेवर असून सध्याचे केंद्र व राज्य सरकार ही आदिवासी गरीब आणि बहुजन यांच्या विकासाच्या विरोधी असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून आदिवासी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोळवाडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती व जयहिंद आदिवासी आश्रम शाळेच्या ३० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या या आदिवासी आश्रम शाळेने राज्यात गुणवत्तेने कायम प्रथम क्रमांक मिळवला असून या शाळेमुळे अनेक कुटुंबांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला आहे आदिवासी विद्यार्थ्यामध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांना संधी मिळाली तर ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. या परिसराने कायम आपल्यावर प्रेम केले असून या गावच्या विकासासाठी सातत्याने अनेक योजना राबवल्या आहेत.
आदिवासी बांधवांसाठी श्रीमती सोनिया गांधी यांच्या पुढाकारातून २००६ मध्ये वन जमिनी बाबतचा कायदा झाला आणि आपण महसूल मंत्री असताना आदिवासींची नावे त्या उताऱ्यावर आली. काँग्रेसने कायम आदिवासी व गोरगरिबांच्या विकासाचे काम केले असून सध्याचे भाजप आघाडी सरकार मात्र बहुजनांच्या आणि आदिवासींच्या विरोधात आहे. मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. मणिपूर पेटते आहे अशावेळी पंतप्रधानांना मणिपूरमध्ये भेट देण्यासाठी वेळ नाही.
मोठी जाहिरात बाजी करून उभारलेले राम मंदिर व नवीन संसद भवन यांच्या उद्घाटनासाठी देशाच्या महामहीम राष्ट्रपतींना बोलवले नाही यावरून हे सरकार कोणत्या विचारांचे आहे हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारांचे सरकार सत्तेवर आहे. सरकारच्या घोषणा फक्त निवडणुकीपुरते आहेत. यांच्या कोणत्याही घोषणांना फसू नका यांना बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी असल्याची टीका त्यांनी केली
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, वंचित आदिवासी व बहुजन समाजाला राज्यघटनेमुळे मताचा अधिकार मिळाला आहे. ही राज्यघटना आणि स्वातंत्र्य महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. गांधींचा मानवतावादी विचार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा असे आवाहन केले. याप्रसंगी दुर्गाबाई तांबे, लकी जाधव व डॉ. जयश्री थोरात यांनी देखील मनोगत व्यक्त केले.