नवरात्रोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि शक्तीचा उत्सव - सौ. धनश्रीताई विखे पाटील
◻️ आश्वी खुर्द येथे प्रवरा शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ
◻️ नवरात्रोत्सवानिमित्त ‘एक झाड आईसाठी’ ही संकल्पना राबवत वृक्षारोपण
संगमनेर LIVE (आश्वी) | महिलांनी आपली जबाबदारी पार पाडताना आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणे गरजेचे आहे. नवरात्रोत्सव काळात महिलांनी आपली संस्कृती समजून घेताना त्यामागील शास्त्र समजून घेतले पाहिजे. कारण नवरात्रोत्सव हा आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि शक्तीचा उत्सव असल्याचे प्रतिपादन सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
महसुल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवरा शैक्षणिक संकुलामध्ये सहकारातून समृद्धीकडे या अंतर्गत प्रवरा शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन आजपासून करण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, विज्ञान, वाणिज्य आणि संगणक महाविद्यालयात प्रवरा शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ करत असताना सौ. विखे पाटील बोलत होत्या. भाजपाच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ. कांचनताई मांढरे, संस्थेच्या संचालिका अँड. सौ. रोहीणीताई निघुते, सौ अलकाताई दिघे, सरपंच सौ. अलकाताई बापुसाहेब गायकवाड, कॅम्पस संचालक डॉ. महेश खर्डे, प्राचार्य डाॅ. देवीदास दाभाडे, क्रिडा संचालक डाॅ. प्रमोद विखे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सौ. धनश्रीताई विखे पुढे म्हणाल्या की, प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिले जाते. या व्यासपीठाच्या माध्यमातून एक आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून होत आहे. सणवार आणि उत्सव याला भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शालेय पातळीवर हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. महिलांसाठी केवळ नऊ दिवस हा उत्सव न राहता सर्वच दिवस आपले आहेत. महिलांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना स्वतःसाठी ही वेळ द्यावा. आयुष्यात स्वप्न बघा ती पूर्ण करण्यासाठी मिळणाऱ्या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढे या, असे आवाहन केले.
प्रारंभी डॉ. सुर्वणा घोलप यांनी प्रास्ताविकामध्ये प्रवरा नवरात्र उत्सवाची पार्श्वभूमी सांगताना या माध्यमातून संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. महाविद्यातील मुलींनी नव दुर्गाची भुमिका साकार करत आपली ओळख करुन देत कार्याची माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा जाधव यांनी तर आभार सोनाली पारधे यांनी मानले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हे सुरू असतात. याच माध्यमातून प्रवरा नवरात्र उत्सव हा आगळावेगळा पद्धतीने शिर्डी मतदारसंघातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये संपन्न होत आहे. नवरात्र निमित्त देवीच्या जागरा बरोबरच एक झाड आईसाठी ही संकल्पना राबवत या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.