निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात आरोग्य सेवेत प्रथम!
◻️ केंद्र व राज्य शासनाच्या राज्यस्तरीय ‘कायाकल्प पुरस्काराने’ होणार आरोग्य केंद्राचा गौरव
संगमनेर LIVE (आश्वी) | केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या २०२३-२४ या वर्षातील कायाकल्प पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक ४१ शासकीय आरोग्य केद्रांना जाहीर झाले आहे. यामध्ये जिल्हांतर्गत संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे त्यांचा ‘कायाकल्प पुरस्काराने’ गौरव होणार आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाने १५ मे २०१५ ला ‘स्वच्छ भारत मिशन’चा विस्तार म्हणून ‘कायाकल्प पुरस्कार योजना’ सुरू केली. सार्वजनिक आरोग्य सेवा-सुविधांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण पद्धती सुधारणे आणि आरोग्य सुविधांना प्रोत्साहन देणे हे उपक्रम राबवणे आवश्यक आहेत. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला विशेषतः गरीब व जोखमीच्या लोकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाते.
राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. राज्यातील ५८० प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव जाळी या आरोग्य केंद्राला जिल्हांतर्गत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. २ लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओपडी असून लोकांना चांगल्या दर्जेदार आरोग्य सेवा दिल्या जातात. तसेच आरोग्य केंद्राचा परिसर देखील अत्यंत सुंदर आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी तसेच डॉ. देविदास चोखर यांच्या सह सर्व कर्मचारी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यानी एकजुटीने केलेल्या चांगल्या कामाचे हे फलित आहे. पुरस्कार मिळणार असल्याने माझ्यासह सर्व कर्मचारी आनंदीत आहेत. या पुरस्काराने आमची जबाबदारी वाढली असून नागरिकांना दर्जेदार व उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी यांनी दिली.