आजी - माजी महसूलमंत्री कार्यकर्त्याला धीर देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल
◻️ भाजप शहराध्यक्ष आणि शिवसेनेच्या (उबाठा) माजी शहराध्यक्षात झाला वाद
◻️ संगमनेरचे राजकीय वातावरण तापले
संगमनेर LIVE | संगमनेर येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले आणि महाविकास आघाडीतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहराध्यक्ष अमर कतारी यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर पोलीस ठाणे गाठून कार्यकर्त्याना दिलासा दिला आहे. एका चहाच्या टपरीवर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संगमनेरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नगर रोडवर असलेल्या एका चहाच्या टपरीवर भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले व शिवसेनेचे (उबाठा) माजी शहराप्रमुख अमर कतारी आमनेसामने आले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची व झटापट झाली. त्यामुळे श्रीराम गणपुले यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले. याबाबत माहिती मिळताच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे कार्यकर्ते देखील पोलीस ठाण्यात आले. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी शहराध्यक्ष गणपुले यांना दिलासा देत पोलिसांकडे संबधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील शिवसेनेचे (उबाठा) माजी शहराध्यक्ष अमोल कतारी यांच्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते देखील बरोबर होते. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षकाकडे चुकीचे गुन्हे दाखल करु नये. तसेच पोलीसांनी निष्पक्षपणे कायद्याचे पालन करावे. अशी मागणी केली. दरम्यान ४० वर्षात पहिल्यांदाच बाळासाहेब थोरात पोलीस ठाण्यात आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.