डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न
◻️ परिषदेत २५८ प्रत्यक्ष आणि ११० ऑनलाइन विद्यार्थ्यानी नोंदवला सहभाग
संगमनेर LIVE (नगर) | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘बहुउद्देशीय न्यायवैद्यक परिचारिका कायद्याची अंमलबजावणी आणि आरोग्य सेवा’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे विश्वस्त वसंतराव कापरे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा अरुण चांदेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व परिषदेची प्रस्तावना सादर केली. या परिषदेत न्यायवैद्यक परिचारिका, पुरावे संकलन, पीडितांचे समुपदेशन आणि कुटुंबास आधार देण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विविध तज्ज्ञांनी आपल्या व्याख्यानांद्वारे फॉरेन्सिक नर्सिंग आणि न्यायवैद्यक शास्त्रावर सखोल माहिती दिली.
डॉ. जयदीपा आर. (प्राचार्य, आय.क्यू.टी.सी., पश्चिम बंगाल) यांनी पुरावे गोळा करण्यात परिचारिकांची भूमिका स्पष्ट केली. प्रा. डॉ. व्ही.डी. पंडारे (न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर) यांनी सिव्हिल आणि क्रिमिनल कायद्यांवर विचार मांडले. तसेच, अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले.
या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या विविध शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिषदेचा समारोप विजेत्यांना पारितोषिक देऊन करण्यात आला. परिषदेत २५८ प्रत्यक्ष आणि ११० ऑनलाइन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.