एअर इंडियाच्या विमानात उंच आकाशात बिघाड ; ना. आठवले अडकले ६ तास विमानात
◻️ मंत्री रामदास आठवलेसह सर्व प्रवासी सुखरूप
◻️ उड्डाण मंत्री के. आर. नायडू यांच्याकडे ना. आठवले तक्रार करणार
संगमनेर LIVE (मुंबई) | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आज सकाळी एअर इंडियाच्या ए आय ८६६ या विमानाने दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले होते.
एअर इंडियाचे हे विमान आकाशात झेपावल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर यशस्वीपणे उतरवण्यात आले. यावेळी विमानात असलेले ना. रामदास आठवले यांच्यासह सर्व प्रवासी सुखरुप बचावले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीसाठी विमान मुंबई विमानतळावर चार तास थांबवण्यात आले. त्यामूळे सकाळी ८ वाजता विमानतळावर आलेले ना. आठवले आणि प्रवासी या विमानात दुपारी १ वाजेपर्यंत अडकून होते.
विमानात बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाने या प्रवाशांना अन्य विमानाने रवाना करणे आवश्यक असताना ६ तासांपेक्षा जास्त वेळ विमानात ताटकळत ठेवले. त्यामुळे विमानातील सर्व प्रवासी संतप्त झाले होते. मंत्री आठवले यांनी देखील एअर इंडियाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली असून नागरी उड्डाण मंत्री के. आर. नायडू यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.