स्मारक उभारणीतील अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार - ना. आठवले
◻️ सातारा येथील भिमाईभूमी स्मारकाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची भेट
संगमनेर LIVE (सातारा) | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माता भीमाबाई आंबेडकरांच्या सातारा येथील भिमाईभुमी स्मारक उभारणीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून लवकर भिमाई भूमीत महामाता भीमाबाई आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाईल. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
आज सातारा येथील भीमाई भूमीला ना. रामदास आठवले यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी भीमाईभूमीचे संरक्षण करून माता भीमाबाई आंबेडकरांच्या स्मारकासाठी अनेक वर्षे प्रयत्नशील असणारे साहित्यिक पार्थ पोळके यांच्या नेतृत्वात भीमाई स्मारकासाठी सर्वतोपरी आपण सहकार्य करणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
सातारा येथे १८९६ साली माता भीमाई आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सातारा येथे करण्यात आला. त्याच ठिकाणी माता भीमाबाई यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. हेच स्मारक स्थळ भिमाई भूमी म्हणून राज्यभरात सुप्रसिद्ध आहे. आज या भिमाई भूमीला ना. रामदास आठवले यांनी भेट देऊन महामाता भिमाई चे स्मारक लवकर उभारण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
दरम्यान यावेळी रिपब्लीकन पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा सरवदे, सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे, उत्तर महाराष्ट्राचे नेते रमेश मकासरे, सौ. लक्ष्मी मकासरे, दयाळ बहादुर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.