ज्यांनी तालुक्याला त्रास दिला त्यांना आता माफी नाही - बाळासाहेब थोरात
◻️ मुख्य खबऱ्या उमेदवार असला तरी, त्या मागच्या प्रवृत्तीला पराभूत करा!
◻️ बाळासाहेब थोरात यांच्याकडून नव्यादा उमेदवारी अर्ज दाखल
संगमनेर LIVE | धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महीलांचा अपमान होत असताना त्यावेळी जनतेसमोर तुम्ही टाळ्या वाजवल्या. या घटनेला तुम्ही जबाबदार आहे. मागील अडीच वर्षात तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करून त्रास दिला. गोरगरीब आणि मजुरांच्या अन्नात माती कालवली. त्यामुळे तालुक्याला त्रास देणाऱ्यांना आता माफी नाही. असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच दहशतवादी प्रवृत्ती रोखण्यासाठी उमेदवार कोण हे न पाहता त्याच्या मागची प्रवृत्ती पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा असे आवाहन त्यांनी केली.
जाणता राजा मैदान येथे काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने नव्यादा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत बाळासाहेब थोरात बोलत होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, डॉ. जयश्री थोरात, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, बाळासाहेब गायकवाड, सौ. दुर्गाताई तांबे, संजय फड, दिलीप साळगट, कैलास वाकचौरे, विश्वास मुर्तडक, दिलीपराव पुंड, अशोक सातपुते आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी राज्यात तोडाफोडी करून आलेले बेकायदेशीर सरकार आणि त्यानंतर राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, हिट अँड रन असे सगळे प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या खालवलेली राजकारणाची पातळी अत्यंत वाईट आहे.
मागील अडीच वर्षापासून आपल्या तालुक्यात सत्ताधाऱ्यांनी सुरू केली. अनेकांना त्रास दिला. तालुक्यातील विविध नागरिकांवर खोट्या केसेस टाकल्या. तालुक्यात सुमारे एक हजार कोटींचे दंड झाले. विकास कामे बंद करून अनेक मजूर व गोरगरिबांच्या अन्नात माती कालवण्याचे काम त्यांनी केले. अनेकांना त्रास दिला पण त्रास देणाऱ्यांना आता माफी मिळणार नाही.
राज्यातील वाळूचे धोरण पूर्णपणे फसले आहे. वाळू माफिया मोठे केले गेले आहेत. राहत्या मध्ये इतकी दहशत आहे की कोणी विरोधी बोलले की तंगड्या मोडल्या जातात.
तीच लोक इकडे येऊन भाषण करत आहेत. महिलांचा अपमान करणारी वक्तव्य केली. त्यामुळे संगमनेर तालुका पेटून उठला. जिच्यावर अन्याय झाला तिच्यावरच गुन्हे दाखल झाले. ज्यांनी गुन्हे केले नाही जे भांडन मिटवायला गेले त्यांच्यावर आठ मिनिटात मोठे गुन्हे दाखल केले ही कुठली पद्धत आहे. प्रशासनाने असे वागायला नको आहे.
निळवंडे धरण आम्ही केली त्यामध्ये तुमचा वाटा काय, तुम्ही अडथळे निर्माण करण्याची प्रयत्न केले. धरण आणि कालवे आम्ही पूर्ण केले. फक्त पाणी तुम्ही सोडले. मदत करणारे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना धरणावर बोलवले नाही इतके नतदृष्ट तुम्ही आहात.
एकदा संगमनेर आणि राहाता तालुक्याची तुलना कराच खुल्या चर्चेला मी तयार आहे. येथील सहकार, समाजकारण, अर्थव्यवस्था, शिक्षण यामुळे संगमनेरचे नाव राज्यात घेतले जात आहे. परंतु ते त्यांना सहन होत नसल्याने खाबऱ्यामार्फत अडथळे निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या तालुक्याचा विकास आपल्याला पुढे न्यायचा असून या वाईट प्रवृत्ती रोखण्याकरता खाबऱ्यांचा चेहरा जरी उमेदवार म्हणून असला तरी या मागच्या प्रवृत्तीला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा असे आवाहन केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, ही सभा तालुक्याच्या स्वाभिमानाची ऐतिहासिक सभा आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका हा विकासाचे मॉडेल बनले आहे. याउलट चालू असल्या संस्था बंद कशा करायच्या हे प्रवरेचे मॉडेल आहे. त्यांना पराभव पचवता आला नाही नैराश्यातून काहीही बोलत आहेत.
२००७ ला जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्याकडे संख्या जास्त असूनही तुम्ही होऊ दिले नाही. सगळी पदे तुमच्या घरामध्ये आहे. काम आले की गोड बोलतात आणि नंतर कृतघ्न होतात अशी तुमची प्रवृत्ती आहे. धांदरफळची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून जे मिटवायला गेले त्यांच्यावर हाफ मर्डर च्या केसेस टाकल्या. एक पेशंट कुठे नाही हा प्रशासनाचा कोणता कारभार आहे. प्रशासनाचा जाहीर निषेध करत असून उमेदवार कोण यापेक्षाही लढाई विखें बरोबर असल्याने सर्वांनी एकत्र येऊन आमदार थोरात यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, आमदार थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन तालुक्याला पुढे नेले आहे. खरे तर या तालुक्याचा विचार शेजारच्यांनी घ्यायला पाहिजे. परंतु ते अडकाठी निर्माण करत आहे. काही असले तरी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचे ते म्हणाले
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, त्यांनी संगमनेर तालुक्याच्या अस्मितेला ठेच पोचवली आहे. हा अपमान माझा एकटीचा नसून तमाम महिलांचा आहे. महिलांचा अपमान करत असताना तुम्ही टाळ्या वाजवत होत्या. तुम्हाला लाज का वाटली नाही. या घटनेची महाराष्ट्राने दखल घेतली. माझ्या पाठीशी सर्व भावंडे उभी राहिली. तर तुम्ही त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. माझ्यावरही केसेस दाखल केला. आता हा तालुका पेटून उठला आहे. यावेळी टाळ्या वाजवणारा आणि शिट्ट्या वाजवणारा उमेदवार समोर असून सर्वांनी त्याचे डिपॉझिट जप्त करून झालेल्या घटनेचा निषेध नोंदवा असे आवाहन केले.
दिवाळीतील गर्दीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये. याकरता दरवर्षाच्या प्रथेप्रमाणे असणारी भव्य रॅली आमदार थोरात यांनी यावेळी न घेता अवघ्या पाच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर जाणता राजा मैदानावर भव्य सभा झाली.
मुख्य खबऱ्या हा उमेदवार...
या निवडणुकीमध्ये उमेदवार हा मुख्य खबऱ्या आहे. तो आता जनतेच्या कचाटयामध्ये सापडला आहे. त्याचा बंदोबस्त मतदान पेटीतून कराच पण याचबरोबर राहाता तालुक्यातही आपल्या सर्वांना काम करायचे आहे. तेथील जनतेला ही दहशतमुक्त करून आनंदाचे वातावरण निर्माण करायचे असल्याने राहाता, संगमनेर, श्रीरामपूर सह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.