गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला पोलीसांनी घेतले ताब्यात
◻️ टोयाटो फॉरच्युनर सह ३१ लाख ७० हजाराचा मुद्देमाल केला जप्त
◻️ निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर उपविभागीय पोलीस पथकाची मोठी कामगिरी
संगमनेर LIVE | निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर उपविभागीय पोलीस पथकाने गावठी पिस्तूल विक्रीच्या हेतूने बाळगणाऱ्या आशिष महिरे (वय - २८) या तरुणाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ३१ लाख ७० हजाराचा मुद्देमाल केला जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना कुरण परिसरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी एक जण येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी दि. २८/१०/२०२४ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सपोनि कल्पेश दाभाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.
मिळालेल्या सुचनानुसार पथक कुरणरोड परिसरात शोध घेत असताना येथील आझाद नगर गल्ली नंबर २ समोरील रस्त्यावर एक जण टोयटो फॉरच्युनर (एम एच १५ एफ ई ९६३०) सह संशयित हालचाली करताना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दिसला. त्यामुळे त्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची आणि फॉरच्युनर गाडीची झडती घेतली असता शिटाखाली सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल मिळून आले. त्यामुळे त्यांच्याकडे पिस्तूलाबाबत चौकशी केली असता ते विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती त्याने पोलीसांना दिली.
यावेळी पोलीसानी ५० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, ३० लाख रुपये किंमतीची टोयटो फॉरच्युनर, १ लाख रुपये किंमतीचां आयफोन मोबाईल, ४० हजार रुपये किंमतीचा आयफोन मोबाईल, १० हजार रुपये किंमतीचा रिअलमीचा मोबाईल तसेच २० हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल असा एकूण ३१ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशिष सुनीलदत्त महिरे (वय - २८, मुळ रा. सातपुर, जि. नाशिक, हल्ली रा. गोल्डन सिटी संगमनेर, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध शस्त्र सुधारणा अधिनियम २०१९ चे कलम ३/२५, ५/२५, ७/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.