अकोले विधानसभा मतदारसंघात माकपचा अमित भांगरे यांना पाठिंबा!
◻️ मत विभाजन टाळण्यासाठी पॉलिट ब्युरो व राज्य कमिटीच्या निर्देशानुसार जिल्हा कमिटीचा निर्णय
संगमनेर LIVE | अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काम सातत्याने वाढत आहे. अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये पक्ष व जनसंघटनांच्या माध्यमातून जनतेचे असंख्य प्रश्न गेल्या २४ वर्षामध्ये सोडवण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला यश आले आहे.
शेतकरी, शेतमजूर, असंघटित कर्मचारी व कामगारांच्या अनेक संघटना उभ्या करून माकपने या मतदारसंघात आपला जनाधार उभा केला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावी अशी रास्त मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.
महाविकास आघाडीतील सर्वच शिरस्त नेत्यांना भेटून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य नेतृत्वाने ही मागणी निर्धाराने लावून धरली होती. पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ. अजित नवले, किसन गुजर व सुनील मालुसरे यांच्या उपस्थितीत अकोले येथे जबरदस्त रॅली काढत व भव्य मेळावा घेत पक्ष या जागेबाबत गंभीर असल्याचे ठोस संकेतही पक्षाच्या वतीने देण्यात आले होते.
मात्र असे असले तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षाला सोडण्यात आली.
या पार्श्वभूमीवर दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या राज्य कमिटीच्या बैठकीत, तसेच दिल्ली या ठिकाणी झालेल्या उपलब्ध पॉलीट ब्युरो सदस्यांच्या बैठकीमध्ये, मत विभाजन टाळण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असे निर्देश पक्षाच्या जिल्हा कमिटीला देण्यात आले.
महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व सुप्रियाताई सुळे यांनी सिल्वर ओक येथे डॉ. अजित नवले व उमेश देशमुख यांच्याशी अकोले येथील उमेदवार जाहीर करण्यापूर्वी सविस्तर चर्चा केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अकोले विधानसभा मतदारसंघात माकपने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
या सर्व प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अहमदनगर जिल्हा सचिव मंडळाची बैठक दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी अकोले पक्ष कार्यालयामध्ये संपन्न झाली. त्यानंतर दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी पक्षाच्या जिल्हा कमिटीची विस्तारित बैठक पक्षाच्या अकोले येथील कार्यालयात संपन्न झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे व राज्य कमिटीने दिलेले निर्देश व महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रियाताई सुळे व इतर विविध पक्षांचे महाविकास आघाडीचे नेते यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाच्या जिल्हा कमिटीने जाहीर केला.
अमित भांगरे यांना या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आले होते.
लोकशाही, संविधान व धर्मनिरपेक्षतेचे रक्षण व्हावे, शेतकरी, शेतमजूर, कामगार कष्टकरी व श्रमिकांच्या बाजूने आर्थिक धोरणे राबवली जावीत, लुटारू भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांच्या विरोधात व त्यांची बाजू घेणाऱ्या सरकारांच्या विरोधात श्रमिकांच्या सुरू असलेल्या संघर्षाला बळ मिळावे, देशात, राज्यात व तालुक्यात धर्म, जाती व प्रांताच्या आधारे पसरवला जाणारा द्वेष संपुष्टात येऊन एकोपा मजबूत व्हावा,
तालुक्यामध्ये आपल्याकडून सर्व धर्मीय एकजूट, सर्व जातीय एकजूट, आदिवासी बिगर आदिवासी एकजूट व श्रमिक एकजूट अधिक मजबूत व्हावी, आगामी काळातील विविध निवडणुकांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करा यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्याला पाठिंबा देत असून आपण वरील विचारांबद्दल आयुष्यभर कटिबद्ध राहण्याचा शब्द मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला द्यावा असे आवाहन यावेळी पक्षाच्या वतीने अमित भांगरे यांना करण्यात आले.
अकोले तालुक्यातील सर्वांगीण प्रगती व श्रमिकांच्या प्रश्नाबद्दल जे आग्रह गेले २४ वर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लावून धरले ते तडीस नेण्यासाठी आपण योगदान द्याल हेही आपण जाहीर करावे असे आवाहन यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अमित भांगरे यांना करण्यात आले.
दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विस्तारित जिल्हा कमिटीच्या समोर अमित भांगरे यांनी अत्यंत प्रामाणिकपणाने वरील विचाराशी आयुष्यभर बांधिलकी राहील याबद्दल आश्वासन दिल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे यांना जाहीर केला असल्याची माहिती डॉ. अजित नवले आणि सदाशिव साबळे यांनी कळवली आहे.