तुमच्या धमक्यांना आमचे कार्यकर्ते घाबरणारे नाही - अमोल खताळ
◻️ महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा इशारा
◻️ समोरील उमेदवाराच्या नावातील ‘विजय’ शब्दचं गायब..
◻️ माझा अनुक्रमांक एक असल्याने मी एक नंबरच्या मताधिक्याने विजयी होणार!
संगमनेर LIVE | आमचा जन्मच या तालुक्यातील ४० वर्षाची सत्ता भोगणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी झालेला आहे. तुम्ही आमच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना धमक्या देऊ नका. स्वाभिमानी कार्यकर्ता तुमच्या धमक्यांना घाबरत नाही पण, जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी नान्नज दुमाला येथील जाहीर सभेतून दिला.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी प्रचारादरम्यान संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला, पारेगाव खुर्द, पोखरी हवेली या भागातील मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना खताळ म्हणाले की, संपूर्ण मतदारसंघातील गावोगावी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते गावागावात जाऊन कार्यकर्त्याना धमकावत आहे. तुम्हीच भाषणातून लोकशाही टिकली पाहिजे असे सांगत आहे. मग कार्यकर्त्याना धमकावत हुकूमशाही मार्गाने लोकशाहीची थट्टा होतं असल्याची टीका त्यांनी केली.
४० वर्ष या भागाचा तुम्ही विकास केला. असे म्हणत असाल तर माझ्या सारख्या ४१ वर्षाच्या तरुणाच्या विरोधात प्रचार करण्यासाठी तुम्हाला तीन तीन खासदार आणि एक माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा यांना बोलवावं लागतं यातच तुम्ही किती विकास केला आहे हे दिसून येत आहे या तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने, लाडक्या बहिणींनी, तरुणांनी माझी निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे नक्कीच या निवडणुकीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उमेदवार खताळ यांनी व्यक्त केला.
तळेगाव निमोणच्या शेजारी असणाऱ्या सिन्नर तालुक्यातील आमदारांनी पाण्याची योजना आणून गावागावात पाणी पोहोचवले आहे. मात्र या तालुक्यातील आमदाराने निमोण, तळेगाव भागातील जनतेच्या जीवावर आठ वेळा निवडणुका जिंकल्या मात्र, आम्हाला ना भोजापुर, ना निळवंडे कोणत्याही धरणाचे अध्याप ही पाणी मिळाले नाही.
परंतु आता ज्यांनी खऱ्या अर्थाने या भोजापुर धरणाची निर्मिती केली त्या माजी मंत्री स्व. बी. जे. खताळ पाटील यांचे नातू असणारे अमोल खताळ हेच या निमोण तळेगावकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावतील यात कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही. त्यामुळे या भागातील जनतेने महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहावे. असे आवाहन नान्नज दुमालाचे माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ नेते भिमराज चत्तर, भोजापूर पूरचारीचे अभ्यासक किसन चत्तर, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे यांनी परिसरातील मतदारांना केले.
समोरील उमेदवाराच्या नावातील ‘विजय’ शब्दचं गायब..
येथून मागील निवडणुकीमध्ये आ. बाळासाहेब थोरात यांच्या नावामध्ये विजय शब्द होता त्यामुळे त्यांचा अनुक्रमांक नंबर एक येत होता मात्र, यावेळी त्यांच्या नावातील विजय शब्दच गायब झाला आहे. त्यामुळे आपल्याला अनुक्रमांक एक मिळाला आहे आणि एक नंबरच्या मतानेच आपण विजयी होणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.