तुम्ही फक्त परिवर्तन करा, तालुक्याची पुढची जबाबदारी माझी - विखे पाटील

संगमनेर Live
0
तुम्ही फक्त परिवर्तन करा, तालुक्याची पुढची जबाबदारी माझी - विखे पाटील 

◻️ संगमनेर महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

◻️ दहशतीचा आरोप करणाऱ्यानी अमृतवाहिनी बँकेची शाखा राहात्यात कशी काढली?

◻️ बहिणींच्या अन्नात माती कालवणाऱ्या महाभकास आघाडीच्या नेत्यांना दारात उभे करुन नका

संगमनेर LIVE | शिर्डी मतदार संघाप्रमाणेच संगमनेरचा विकास आपल्याला करायचा आहे. तुम्ही फक्त परिवर्तन करा. या तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मी घेतो. आमच्यावर दहशतीचा आरोप करता, तर मग अमृतवाहिनी बँकेची शाखा राहात्यात काढावीशी का वाटते? असा सवाल महसूल तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या निमित्ताने समनापूर गणपती मंदीरापासून युवकांची भव्य रॅली काढण्यात आली. महायुतीचा जयघोष करीत शहरातील प्रमुख रस्यामनवरुन काढण्यात आलेल्या या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित केलेल्या जाहिर सभेत मंत्री विखे पाटील यांनी थोरातांच्या निर्षियतेवर बोट ठेवून त्यांनी केलेल्या आरोपांचा कडक शब्दांत समाचार घेतला.

मंत्री विखे पाटील म्हणाले, की शिर्डीत दहशत असती, तर संगमनेरच्या मालपाणी परिवाराला वॉटरपार्कचा प्रकल्प उभारावा वाटला असता का? या तालुक्यातील आमदारांचे बंधू आमच्या तालुक्यात येवून २० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे शासकीय कामे करतात तेव्हा त्यांना दहशत वाटली नाही का? राहाता पंचायत समितीचे १२ कोटी रुपयांचे काम संगमनेर साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या भावाने केले त्यांना विचारा तेथे दहशत होती का? दहशत असती तर आमदार थोरातांना सुद्धा राहात्यामध्ये अमृतवाहिनी बँकेची शाखा काढाविशी वाटली असती का? असा प्रश्न उपस्थित करुन खरी दहशत तर तुमच्या तालुक्यात आहे. वर्गात जावून प्राध्यापकांना मारण्याची संस्कृती आमची नाही. स्वता:ला सुसंस्कृत म्हणवून घेता तर धांदरफळ सभेनंतर महिलांवर केलेल्या हल्याबाबत माफी मागण्याची दानत तुमची नाही. तुम्ही काहीच केले नाही तर आरोपींना लपवून का ठेवता, असा घणाघात त्यांनी केला.

या तालुक्यातील कारखाना पद्मश्री विखे पाटील, बी. जे. खताळ पाटील, भास्करराव दुर्वे, दत्ता देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे उभा राहिला. पण, याची साधी तुम्हाला आठवणही राहिली नाही. वर्षानुवर्षे केवळ स्वता:च्या मक्तेदाऱ्या तयार करुन माफिया निर्माण केले. पाण्यासाठी लोकांना झुंझत ठेवले. या तालुक्यातील युवक रोजगार मागत आहेत. पण तोही तुम्ही त्यांना दिला नाही. कोणता विकास तुम्ही केला. जोर्वे गावात तुमच्या घराकडे जाणारा रस्तासुद्धा मलाच करुन द्यावा लागला. असा टोला लगावून या तालुक्यात परिवर्तन आता अटळ आहे. तुमच्या पापाचा घडा आता भरला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हे काँग्रेसचे नेते बंद करायला निघाले होते. बहिणींच्या अन्नात माती कालवणाऱ्या या महाभकास आघाडीच्या नेत्यांना आता दारातही उभे करुन नका असे सांगून लाडक्या बहिणीच आता तुमची जागा तुम्हाला दाखवून देणार असल्याचे सांगितले. 

अनेक वर्षे महसूल मंत्री म्हणून मिरवलात. जिरायती पट्टयातील युवकांसाठी औद्योगिक वसाहत तुम्ही निर्माण करु शकला नाही. आता ही वसाहत आम्ही निर्माण करुन दाखवू असे विश्वासीत करुन या तालुक्यात फक्त जमिन खरेदी विक्री करणारे एजंट तयार झाले. बोगस खरेदी केल्या गेल्या. कऱ्हे आणि चिकणी गावातील वनजमीनी हडप केल्या गेल्या या सर्वांची चौकशी आता सुरु झाली आहे. महायुती सरकारने दोन वर्षात ६०० कोट रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. वेगवेगळ्या योजनांमधून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. 

महाविकास आघाडीच्या काळात असे कधी घडले नव्हते. राज्यात महायुतीचा जनाधार आता वाढत चालला आहे. संगमनेर तालुक्यातही महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून परिवर्तन घडवा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी भाजपाचे वैभव लांडगे, श्रीराम गणपुले, शिवसेनेचे रामभाऊ रहाणे, रिपाईचे अशिष शेळके, उमेदवार अमोल खताळ यांची भाषणे झाली. या सभेस तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !