◻️ बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे मैदानात
◻️ लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा
संगमनेर LIVE | सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीवर संगमनेरचा सहकार कार्यरत असून त्यामुळे तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत तर झाली पण राज्यामध्ये संगमनेरचा लौकिक निर्माण झाला. निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून जनतेला पाणी देण्याबरोबरच आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या असल्याचे गौरवउद्गार मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील जाखुरी संगमनेर खुर्द, अंभोरे, पिंपरणे आदी गावांमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या भेटीगाठी दरम्यान डॉ. तांबे बोलत होते.
याप्रसंगी डॉ. तांबे म्हणाले की, संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असून ती परंपरा आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुढे चालवली आहे. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेतले. रात्र - दिवस काम करणाऱ्या या नेतृत्वाने संगमनेरचा राज्य पातळीवर गौरव वाढवला आहे.
निळवंडे धरण जीवनाचे ध्यास मानून धरणासह कालवे पूर्ण केले आणि मागील वर्षी दुष्काळी भागातील जनतेच्या शेतात पाणी आले. कोरोना संकटात सर्व जग बंद होते. फक्त दवाखान्यांच्या सोबत आपल्या निळवंडे धरणाचे कालवे सुरू होते आणि अशा संकट काळातही आमदार बाळासाहेब थोरात दररोज या कालव्यांचा आढावा घेत होते. डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम पूर्ण व्हावे याकरता शंभर फूट उंचीवर जाऊन त्यांनी पाहणी केली.
पक्ष फोडाफोडी करून राज्यात सत्तांतर झाले आणि ज्यांनी या कामांमध्ये अडचणी निर्माण केल्या त्या लोकांनी उद्घाटन केले परंतु ते जनतेला मान्य झाले नाही.
पाणी आले याचे गावोगावी आनंदाने स्वागत झाले आणि लोकांनी जलनायक उपाधिने आमदार थोरात यांना गौरवले. लोकांसाठी राबणारा सातत्याने काम करणारा लोकनेता म्हणून त्याची राज्यात ओळख झाली आहे.
लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली आहे. राज्यघटना ही देशाच्या एकात्मतेचा आत्मा आहे. राज्यघटना बदलवण्याचा डाव जातीयवादी शक्तीचा असून भाजपा हा खोटारडा पक्ष आहे. भाजपने अनेक वेळा जनतेला फसवले आहे. पक्ष बदलणाऱ्यांनी पक्षनिष्ठे बद्दल काय बोलावे. इतके रसातळाला गेलेले राजकारण कधीही महाराष्ट्राने पाहिले नाही अशी टीका करताना आमदार बाळासाहेब थोरात यांना राज्यातून सर्वाधिक मतांनी सर्वांनी निवडून देण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले
दरम्यान यावेळी गावोगावी शेतकरी, नागरिक, महिला, युवक या सर्वाशी संवाद साधताना सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.