काय सांगता.. आश्वीचे आण्णासाहेब भोसले संगमनेरचे आमदार होणार होते?
◻️ विलक्षण आणि बहुआयामी व्यक्तीमत्वाला ७७ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
◻️ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवणीना उजाळा
संगमनेर Live (संजय गायकवाड) | अफाट स्मरणशक्ती, थक्क करणारी विद्वत्ता, अन् समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत न सामावणारा व्यासंगी आवाका, याचे दृष्य स्वरूप म्हणजे आण्णासाहेब भोसले.. अशा बहुआयामी व्यक्ती जेव्हा जन्माला येतात, तेव्हा त्या केवळ एक व्यक्ती म्हणून मर्यादीत राहत नाहीत तर, त्यांचे स्थान एखाद्या ज्ञानसंचित विद्यापीठा इतके विस्तीर्ण होते.
विशेष म्हणजे १९८५ साली संगमनेर विधासभा मतदार संघाचे आमदार होता - होता ते राहूण गेले.? पण साधी खंतही कधी त्यानी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिली नाही. हे सत्य जर आजच्या पिढीला सांगितले तर विश्वास बसणार नाही. अशा राजकारणाच्या विद्यापीठात प्रत्यक्ष शिकण्याची संधी माझ्यासह अनेकाना मिळाल्यामुळे त्याच्या ७७ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त केलेला हा लेख प्रपंच..
आज आण्णासाहेब भोसले ७७ वर्षाचे होतायत. आश्वी पंचक्रोशीत राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तीमत्व म्हणून त्याची असलेली ओळख ही कट्टर विरोधकांना ही नेहमी भुरळ पाडणारी राहिली आहे. त्यामुळेचं त्याच्या नेतृत्व, कर्तुत्व व क्षमतेबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आश्वी खुर्द सह परिसरातील कप्पा ना कप्पा, व्यक्ती ना व्यक्ति, गट आणि तट, पक्ष आणि नेते यांची खडान-खडा माहिती कोणाजवळ असेल तर आण्णासाहेब भोसले यांच्याकडे ती आहे. त्यामुळेचं आश्वी खुर्द गावात आजतागायात त्यानी सर्व पातळ्यावर सत्ता टिकवून ठेवली आहे. यावरून या वयातही त्याचे राजकारणातील इच्छाशक्तीचे सामर्थ्य किती आफाट आहे, यांचा प्रत्येय नुकत्याचं झालेल्या आश्वी खुर्द सेवा सोसायटी असो अथवा ग्रामपंचायत निवडणूकीत एकहाती सत्तेचे निर्भळ यश मिळवून त्यानी दाखवून दिले.
आण्णासाहेब भोसले यांच्याकडे व्यक्तीत्वाचे अनेक पैलू आहेत. आश्वी खुर्द गाव त्यानी ज्या पध्दतीने चौफेर विकासाच्या बाबतीत आघाडीवर नेले, त्याला तोड नाही. त्यानी परिसराची शिक्षणाची गरज ओळखून गावात विद्यालय व महाविद्यालय उभे केले. आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, आठवडे बाजार, पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा सहकारी बँकेची शाखा, देवालय ट्रस्ट सारख्या संस्था उभ्या करण्यात सिहांचा वाटा उचलला.
माऊली कृपा पतसंस्थेची स्थापना करुन ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालणा देण्यासाठी दुग्ध व्यवसाय तसेच संस्था उभारणीचा पाया त्यानी रचला. जबाबदारी वाटून द्यायची आणि विश्वास टाकून काम करुन घ्यायचे, अशी एक विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यानी गावपातळी ते जिल्हापातळीवरील अनेक संस्था उभ्या करण्यात व यशस्वीपणे चालवण्यात दिलेले योगदान अव्याहतपणे आजही सुरु आहे. आपल्या शेतात विविध प्रयोग करत असल्यामुळे १९७५ साली राज्य सरकारने ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ हा मानाचा पुरस्कार मिळालेले, त्याकाळातले व अहमदनगर जिल्ह्यातील बहुदा ते पहिले शेतकरी होते.
आण्णासाहेब भोसले यांचे आश्वी खुर्द गावच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत न पुसता येणारे योगदान असून शेती, सहकार व शिक्षण या क्षेत्रात त्यानी आपल्या कार्यकर्तुत्वाची अमीट अशी छाप सोडली आहे. जिल्हापरिषद सदंस्य असताना चणेगाव, पानोडी व प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असतील, दाढ खुर्द, चणेगाव व ओझर खुर्द येथिल जिल्हापरिषद शाळेच्या खोल्या, उंबरी बाळापूर, आश्वी खुर्द, चिचंपूर, चणेगाव येथील पाणी पुरवठ्याच्या विहीरी त्यानीचं केलेल्या पाठपुराव्यामुळे पुढे पुर्णत्वास गेल्या. जागतिक पटलावर छाप सोडताना इस्रायल, इजिप्त, तुर्कस्तान, हंगेरी, स्विझरलँड, पोलंड, ऑस्ट्रेलिया व जर्मनी सारख्या देशाचे ते शेतीविषयक अभ्यासाचे सल्लागार म्हणूनही काम करताना या देशाचे दौरे करुन तेथील शेतीचा अभ्यास देखिल त्यानी केला आहे.
आण्णासाहेब भोसले हे दिवगंत मा. मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे जीवलग मित्र होते. आण्णासाहेब यांचे राजकारण व समाजकारणातील कसब बी. जे. खताळ पाटील याना माहीत असल्यामुळे १९८५ साली त्यांना कॉग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्यासाठी त्यानी तयार केल्याचे बोलले जाते. परंतू पुढे थेट दिल्लीतून सुत्र हालल्यामुळे आण्णासाहेब भोसले यांचे तिकीट कापले गेले व पुढे जे घडले तो इतिहास आपल्या सर्वांना माहित आहेचं. त्यामुळेचं बहुदा आजही जुनी जाणती मंडळी ‘आण्णासाहेब भोसले आमदार होता - होता राहुन गेले’ असे म्हणत असावी.
अनेक विलक्षण गुण असलेले आण्णासाहेब भोसले वयाच्या आवघ्या २० व्या वर्षी राजकारणात आले. त्याकाळातील थोर व दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभुषन खा. बाळासाहेब विखे पाटील व शरद पवार यांच्याशी असलेले आपुलकीचे नाते यातंच त्याचे मोठेपण दडलेले आहे.
आजही ७७ वर्षाचे असूनही सकाळीचं उठून शेतीला फेरफटका मारणे, निवडणूक आली की, केवळ विकासाच्या मुद्यावर पायाला भिगंरी लावून प्रचार करणे, गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख - दु:खात केवळ सहभागी न होता पाठीशी ठामपणे उभे राहणे. ही विलक्षण उर्जा केवळ आण्णासाहेब भोसले यांच्याकडे असल्याचे पहायला मिळते. विखे पाटील कुटुंबाच्या चार पिढ्याशी आण्णासाहेब भोसले यांचे असलेले अतुट नाते हे आज ही त्याच ताकदीने त्यानी टिकवून ठेवल्याचे पहायला मिळते. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तीमत्वाला ७७ व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छां.!
लेखक :- संजय गायकवाड
वरील लेख हा दोन वर्षांपूर्वीचा असून आज त्याच्यां वाढदिवसानिमित्त तो पुन्हा लोकांपर्यत पोहचवला आहे.