गुलामगिरी आणि दहशतमुक्तीसाठी ही लढाई - बाळासाहेब थोरात
◻️ आश्वी खुर्द येथे कॉग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांची प्रचार सभा
◻️ सभेच्या ठिकाणी जामर बसवल्याचा बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप
संगमनेर LIVE | मी शिर्डी मतदार संघाचा मतदार असून संगमनेर प्रमाणे स्वातंत्र्याचे व आनंदाचे वातावरण राहाता तालुक्यात निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. राहाता तालुक्यातील जनतेला गुलामगिरी व दहशतुतून मुक्त करण्यासाठी ही लढाई असल्याने यामध्ये सर्व जनतेने सहभागी होऊन सौ. प्रतिभाताई घोगरे यांच्या पाठीशी उभे रहावे. असे आवाहन करताना आश्वी खुर्द येथील सभा परिवर्तनाची सुरुवात ठरेल असे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बाळासाहेब थोरात बोलत होते. बाळासाहेब गायकवाड, डॉ जयश्रीताई थोरात, सचिन कोते, बापूसाहेब भवर, तात्यासाहेब गायकवाड, मिलिंद कानवडे, सचिन चौगुले, सोनल जगताप, सौ. प्रतिभा जोंधळे, ॲड. रामदास शेजुळ, अर्चना भुसाळ, नामदेव शिंदे, प्रमोद बोंद्रे, रामनाथ तांबे, दिपाली वर्पे, गणपतराव सांगळे, विक्रम थोरात, राजेंद्र चकोर, अशोक वाणी, अशोक जोशी, विवेक तांबे, गणेश जोरी आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, मागील ६० वर्ष खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अशी विविध पदे तुमच्याकडे होती. मात्र तरीही तुम्हाला एमआयडीसी करता आली नाही. तसेच मृत्यूचा सापळा असलेला नगर - मनमाड रस्ताही झाला नाही.
राहाता तालुक्यात दहशतीचे व सुडाचे राजकारण असून पिण्याच्या पाण्यात सुद्धा राजकारण केले जाते. वाळूचे धोरण फसले आहे. तलाठी भरती मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. गोरगरिबांच्या अन्नात माती कालवण्याचे काम या मंडळीने केले असून निवडणुकीसाठी तरुणांना वाईट वळणाला लावले जात आहे.
संगमनेर तालुका हा सुसंस्कृत आणि शांततेच्या तालुका म्हणून ओळखला जातो. तेथील घडी विस्कळीत करण्यासाठी हे काम करतात. माझे आव्हान आहे की खुली चर्चा होऊन जाऊ द्या. संगमनेर आणि राहात्याची प्रत्येक क्षेत्रात तुलना करा. दहशतीचे आजादी हे घोषवाक्य घेऊन सर्वांनी एकजुटीने व मत विभाजन टाळत सौ. प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
उमेदवार सौ. प्रभावती घोगरे, डॉ. जयश्रीताई थोरात, बाळासाहेब गायकवाड यांची देखील यावेळी भाषणे झाली.
सभेच्या ठिकाणी जामर?
सौ. प्रभावतीताई घोगरे या अगदी सहज आणि अंतकरणापासून बोलतात, त्यांची लोकप्रियता मोठी आहे. परंतु त्यांची भाषणे लोकांपर्यंत जाऊ नये. याकरता ज्या ठिकाणी सभा असतील. त्या ठिकाणी जामर बसवले जात आहेत. मीडियाची मुस्कटदाबी केली जात आहे. कोल्हार आणि आश्वी खुर्द येथील सभा बाहेरच्या लोकांना पाहता येऊ नये याकरता इंटरनेट बंद केले जात आहे. असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.