महायुती सरकारने विविध योजनाच्या माध्यमातून जनतेला आधार दिला - विखे पाटील

संगमनेर Live
0
महायुती सरकारने विविध योजनाच्या माध्यमातून जनतेला आधार दिला - विखे पाटील 

◻️ हजारवाडी, पानोडी आणि पिंप्री - लौकी अजमपुर गावात मंत्री विखे पाटील यांचा संवाद दौरा

◻️ आ. थोरातांना त्‍यांची निष्‍क्रीयताच आता सतावत असल्याचे म्हणत विखे पाटलांची घणाघाती टिका 

◻️ शिर्डी मतदारसंघातील जनता तुमच्या खोट्या आरोपांना बळी पडणार नाही

संगमनेर LIVE | अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना सतावत आहे. त्‍यामुळेच शिर्डी मतदार संघात येवून दहशतीच्‍या मुद्यातून मतदारांची दिशाभूल करीत आहे. परंतू आमचा मतदार हा खुप सुज्ञ आहे. तुमच्‍या या खोट्या आरोपांना तो बळी पडणार नाही. तुमच्‍या निष्‍क्रीयतेचे पितळ तुमच्‍याच मतदार संघात आता उघडे पडले असल्‍याची जोरदार टिका नामदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

महायुतीच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्‍यातील हजारवाडी, पानोडी आणि पिंप्री - लौकी अजमपुर या गावांमध्‍ये आयोजित केलेल्‍या बैठकांमध्‍ये तसेच पदयात्रेतून मंत्री विखे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. या तीनही गावात मतदारांनी मंत्री विखे पाटील यांचे जोरदार स्‍वागत केले. लाडक्‍या बहीणीही या स्‍वागतासाठी मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या.  

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, आज निळवंडेचे पाणी आल्याने हा भाग समृद्ध झाला याचा आपल्यासाठी मोठा आनंद आहे. विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जनतेला आधार देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. आमच्याकडे अनेक योजना आहेत तुमच्या मंत्री काळात केवळ वाळू उपसा योजना होती आणि त्या माध्यमातून तुम्ही काय केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

शिर्डी विधानसभा मतदार संघात ही गावे समाविष्‍ठ झाल्‍यानंतर सर्वांना विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. ही गावे शिर्डीत जोडल्‍यानंतरही या गावांमध्‍ये गैरसमज निर्माण करुन दिले होते. परंतू आता लोकांना कळाले त्रास नेमका कुणाचा आहे. आम्‍ही विकासाला माणनारी माणसं आहोत. या भागातील जनतेमध्‍ये एक विश्‍वासाचे नाते निर्माण केले. जे तुम्‍ही तुमच्‍या तालुक्‍यातही निर्माण करु शकला नाहीत.

आमचे सरकार हे देणारे आहे, त्यांचे सरकार हे घेणारे होते. त्यामुळे चिंता करू नका आम्ही देत राहणार आहोत कोणतेही योजना बंद पडणार नाही याची ग्वाही देत मंत्री विखे पाटील म्हणाले की, कॉंग्रेसने विकासाची पंचसुत्री ही शुध्‍द फसवणूक आहे. महायुीची योजना बंद करायला जे निघाले होते ते आता त्‍याच योजनेचे नाव बदलून पैसे द्यायला निघाले आहेत. यावर कोणीतरी विश्‍वास ठेवील का असा प्रश्‍नही त्‍यांनी उपस्थित केला.

या भागातून जाणाऱ्या निळवंडे कालव्‍याचा प्रश्‍न त्‍यांच्‍या काळातच प्रलंबित राहीला. जमीनींचे अधिग्रहन झाल्‍यानंतरही शेतकऱ्यांना त्‍याचा मोबदला मिळू शकला नाही. आपण त्‍याचा पाठपुरावा केला. जमीनींचा मोबदला मिळाला आणि पाणीही मिळाले. जेष्‍ठनेते मधूकरराव पिचड यांच्‍या पुढाकाराने दोन्‍हीही कालव्‍यांची कामे मार्गी लागली. मग इतके वर्षे कालव्‍यांची कामे का होवू शकली नाही. या प्रश्‍नाचे केवळ राजकारण आपल्‍याला करायचे होते. जनता हे समजण्‍या इतकी दूधखुळी नाही. निळवंडे कालव्‍यांचे पाणी आणण्‍याचे श्रेय हे फक्‍त महायुती सरकारचेच असल्‍याचे ना. विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण आणि श्रीक्षेत्र नेवासा येथे ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्‍प ठरणार असल्‍याकउे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, अनेक वर्ष संगमनेरचे नेते मंत्रीपद भोगत होते पण त्‍यांना असे काही करता आले नाही. रोजगार निर्मितीही ते उभी करु शकले नाहीत. महसूल मंत्रीपद मिळाल्‍यानंतर जिल्‍ह्यातील तीन तालुक्‍यांना औद्योगिक वसाहतींना आपण जागा उपलब्‍ध करुन दिल्‍या.

तुमच्‍या तालुक्‍यात असे का घडले नाही असा सवाल उपस्थित करुन, आ. थोरातांना त्‍यांची निष्‍क्रीयताच आता सतावत आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्‍या युवा संकल्‍प सभेला मिळालेल्‍या प्रतिसादामुळे ते पुर्णपणे हादरले आहेत. तालुक्‍यातील युवक आता त्‍यांच्‍या बरोबर जायला तयार नाहीत. जेष्‍ठ नागरीक आणि महिला देखील चाळीस वर्षांच्‍या वाटचालीवर तिव्र प्रतिक्रीया व्‍यक्‍त करु लागल्‍याने आ. थोरात हतबल झाले असल्‍याची टिका त्‍यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !