कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या खोऱ्यात आणण्‍याची संधी मिळाली

संगमनेर Live
0
कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या खोऱ्यात आणण्‍याची संधी मिळाली

◻️ जलसंपदा खात्याचे मंत्रीपद मिळाल्यानंतर विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास 

 ◻️ स्‍व. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्नं पुर्ण करण्याची दिली ग्वाही

संगमनेर LIVE (अहिल्‍यानगर) | मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्‍या अतिशय महत्‍वाच्‍या खात्‍याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्‍व. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खोऱ्यात आणण्‍याचे स्‍वप्‍न या निमित्‍ताने पुर्ण करण्‍याची संधी मिळाली असल्‍याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्‍यानंतर ना. विखे पाटील यांचे अहिल्‍यानगर येथे प्रथमच आगमन झाले. डॉ. विखे पाटील फौंडेशन येथे जेष्‍ठ समाजसेवक पद्मविभूषण आण्‍णासाहेब हजारे यांचे आशिर्वाद घेतले. त्‍यांनी केलेल्‍या सत्‍काराचाही स्विकार केला. आ. शिवाजीराव कर्डीले, आ.‍ काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मा. आ. अरुणकाका जगताप, नाशिक विभागाचे आयुक्‍त डॉ. प्रविण गेडाम, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर आदिंनी त्‍यांचे स्‍वागत केले.

माध्‍यमांशी बोलताना ना. राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, राज्‍य मंत्रीमंडळात जलसंपदा विभागाची मिळालेली जबाबदारी ही काम करण्‍याची एक संधी असून, विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्‍या जबाबदारीतून स्‍व. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याचे दायित्‍व मुख्‍यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविले आहे. ती जबाबदारी निश्चितपणे यशस्‍वी करण्‍यासाठी माझा प्रयत्‍न असेल असे त्‍यांनी सांगितले.

कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खोऱ्यात वळविण्‍यासाठी डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्‍ट्र पाणी परिषदेच्‍या माध्‍यमातून केंद्र आणि राज्‍य सरकारला मसुदा सादर केला होता. त्‍याचेच आता धोरणात रुपांतर झाले. विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता हा महत्‍वकांक्षी प्रकल्‍प पुर्ण करणाचे ध्‍येय ठेवले आहे. राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी पुढाकार घेतल्‍याने गोदावरीच्‍या तुटीच्‍या खोऱ्यात पाणी वळविण्‍याचे एैतिहासिक काम भविष्‍यात पुर्ण करण्‍यासाठी आता वाटचाल असेल. कृ‍ष्‍णा खोऱ्यातील पाणी प्रश्‍नाबाबतही निश्चित असे धोरण घ्‍यावे लागेल. बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण, शेतीच्‍या पाण्‍याचे निर्माण होणारे प्रश्‍न, पाण्‍याची उधळपट्टी थांबविणे आणि पाणी सोडण्‍याच्‍या वितरण व्‍यवस्‍थेत चांगली सुधारणा करणे. यासाठी आता काम करावे लागणार असल्‍याचे ना. विखे पाटील म्‍हणाले.

विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही, यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, विरोधी पक्षाचा अवतार निवडणूकीतच संपला होता. निवडणूकीच्‍या दरम्‍यानच महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली होती. त्‍यांचे अस्तित्‍व आता राहीलेले नाही अशी टिका करुन, त्‍यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात जरांगे पाटील यांनी नव्‍या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे. यापुर्वी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले आरक्षण कायदेशिरदृष्‍ट्या टिकले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्‍याबाबत आमचे सरकारही सकारात्‍मकच आहे. मात्र मध्‍यंतरी महाविकास आघाडी सत्‍तेवर आल्‍यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गमवावे लागले. आरक्षणाच्‍या बाबतीत महाविकास आघाडी गंभिर नव्‍हते याचे पाप त्‍यांच्‍या डोक्‍यावर आहे.

राज्‍यात महायुतीचे सरकार होते त्‍यावेळी आरक्षणाच्‍या बाबतीत आवश्‍यक तेवढे सर्व निर्णय घेण्‍यात आले होते. मागासवर्ग आयोगाची निर्मिती केली. राज्‍यात ५८ मोर्चे आणि अनेकांचे बलिदान झाले. पण ही सर्व परिस्थिती संयमाने हाताळण्‍याची जबाबदारी ही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्‍वी केली होती. आताही त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍यात नव्‍याने सरकार स्‍थापन झाले आहे. इतर कोणत्‍याही समाजाच्‍या  आरक्षणाला धक्‍का न लावता, चर्चेतुन हा प्रश्‍न सोडविता येईल. जरांगे पाटलांनी नव्‍या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

बीड आणि परभणी येथील घटनेबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्‍तर देताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, या दोन्‍हीही घटनांबाबत मुख्‍यमंत्र्यांनी नागपुर आधिवेशनामध्‍ये सरकारची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. या दोन्‍हीही घटना अतिशय दुर्दैवी असून, दोषी व्‍यक्तिंवर कारवाई करण्‍याच्‍या सुचनाही देण्‍यात आल्‍या आहेत. घटनेबाबत आता चौकशी समितीही नेमण्‍यात आली असून, या घटनेचे आता राजकारण करु नये. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येवून जातील परंतू त्‍यानंतर निर्माण होणारा सामाजिक तणाव तसेच जातीजातींमध्‍ये उमटणारे पडसाद याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल ना. विखे पाटील यांनी उपस्थित केला.

समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांच्‍या कुटूंबातील विवाह सोहळ्यास मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थि‍त होते. डॉ. विखे पाटील फौंडेशनमध्‍ये पद्मविभूषण आण्‍णासाहेब हजारे यांच्‍यासह मंत्री विखे पाटील यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन देखील उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !