फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात नवख्या मंत्र्याना वजनदार खाती

संगमनेर Live
0
फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात नवख्या मंत्र्याना वजनदार खाती

◻️ राधाकृष्ण विखे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन या दिग्गज नेत्यांना धक्का, अजित पवाराचा शब्द खरा ठरला

संगमनेर LIVE | महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेल्या अनेक मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली आहेत. अनेक वेळा मंत्री राहिलेल्यांपेक्षा नवख्या मंत्र्यांना मोठे बजेट असलेले खाते मिळालेले आहे. मागील सरकारमध्ये महसूलमंत्री असलेले राधाकृष्ण विखे यांना जलसंपदा खाते मिळाले आहे. तेही गोदावरी व कृष्णा खोरे विकास विभागाची जबाबदारी मिळाली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूलमंत्री हे महत्त्वाचे खाते मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपामध्ये अनेक नव्याना वजनदार खाते दिले आहेत. तर अजित पवार गटाकडे कृषीमंत्री हे महत्त्वाचे खाते आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, ऊर्जा अशी महत्त्वाची खाती आली आहेत. भाजपचे १९ मंत्री आहेत. त्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आले आहे. मागील सरकारमध्ये रवींद्र चव्हाणांकडे हे खाते होते. तर जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते मिळाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही महत्त्वाचे खाते हे सातारा जिल्ह्याच्या आमदारांकडे गेले आहेत.

आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान मंत्री, अशोक उईके यांना आदिवासी विकास खाते मिळाले आहे. तर अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांना कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी हे खातं धनंजय मुंडे यांच्याकडे होतं. भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांना मात्र माहिती आणि तंत्रज्ञान या खात्याचे मंत्री करण्यात आलं आहे. आशिष शेलार यांना मोठं खातं मिळेल असे अपेक्षित होते मात्र त्यांना कमी महत्वाचं खातं देण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

अनुभवी नाईकांना वन खात्याची जबाबदारी..

भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक मागील मंत्रिमंडळात नव्हते. आता मात्र त्यांना थेट वनखात्याची जबाबदारी मिळाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट करून हे खातं अनुभवी नेत्याच्या हाती देण्यात आलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांना याआधी मंत्रिपदाचा अनुभव नव्हता. परंतु पक्षाने यंदा त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. नितेश राणेंना मत्स्य आणि बंदरे विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग देण्यात आला आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांना रोजगार हमी, प्रताप यांना वाहतूक आणि संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय ही खाती दिली आहेत. मागील सरकारमध्ये शंभूराज देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क विभाग होता. या विभागाद्वारे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. आता या खात्याचा कारभार अजित पवार यांना मिळाला आहे.

विखे, मुंडे, महाजन या दिग्गजाना धक्का..

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपाचाच वरचष्मा दिसला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. 

भाजपाचाच विचार केला तर राधाकृ्ष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचं राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजित पवार गिरीश महाजनांना उद्देशून म्हणाले होते की, “गिरीश आता तरी सुधर रे, कट होता होता वाचलास” अशी टोलेबाजी केली होती ती आता खरी ठरल्याचे दिसत आहे.

महायुतीच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं. त्यामुळे या मंत्र्यांना खातेवाटप करता आलं नाही. मात्र काल अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आलं. या खातेवाटपाचं वैशिष्ट्य म्हटलं तर ज्यांना मंत्रि‍पदाचा फारसा अनुभव नाही अशा आमदारांना मोठी खाती दिली आहेत. काही माजी मंत्र्यांची जुनीच खाती त्यांच्याकडे कायम ठेवली आहेत. तर काही माजी मंत्र्‍यांची राजकीय ताकद कमी करण्याचाही प्रयत्न झाला आहे.

पंकजा मुंडेंना जुनं खातं नाहीच..

यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना धक्का बसल्याचं दिसत आहे. २०१४ मधील युती सरकारच्या काळात पंकजा मुंडे महिला व बालविकास खात्याच्या मंत्री होत्या. परंतु, नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे खातं अदिती तटकरे यांना मिळालं होतं. पुढील महायुती सरकारच्या काळातही तटकरे यांच्याकडेच हे खातं होतं. त्यामुळे आताच्या सरकारमध्ये अदिती तटकरे यांनाच पुन्हा हे खातं मिळालं. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मात्र पशुसंवर्धन खातं मिळालं आहे.

विखे पाटील जलसंपदा मंत्री पण खात्यातही विभागणी..

शिंदे सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील महसूल खात्याचे मंत्री होते. अर्थ खात्यानंतरचं महत्वाचं खातं म्हणून महसूलकडे पाहिलं जातं. यंदाही हे खातं विखे पाटील यांनाच मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती महसूलच्या चाव्या दिल्या. तर विखे पाटील यांनी जलसंपदा खातं देण्यात आलं तेही विभागून. तसेच त्यांच्याकडील आधीची दोन खातीही काढून घेण्यात आली आहेत. आता विखे पाटील यांच्याकडे गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार असेल. त्यामुळे तीन पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या सरकारचा विखे पाटील यांना फटका? बसल्याची कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे.

महाजनही अर्ध्या खात्याचे मंत्री..

भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनाही या खातेवाटपात धक्का बसला आहे. शिंदे सरकारच्या काळात त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पर्यटन अशी दोन मोठी खाती होती. आता ही दोन्ही खाती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत. याऐवजी त्यांना जलसंपदा खातं मिळालं आहे. पण यातही फक्त विदर्भ आणि तापी खोऱ्याचा कारभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांना मिळाली आहे.

शंभूराज देसाईंच्या खात्याचे मंत्री अजितदादा..

शिंदे सरकारच्या काळात शंभूराज देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क विभागाचा कारभार होता. राज्य सरकारला महसूल मिळवून देणारं हे एक महत्वाचं खातं आहे. परंतु, यावेळी शिंदेंना हा विभाग आपल्याकडे राखता आला नाही. खातेवाटपात अजित पवार या खात्याचे मंत्री झाले आहेत. तर शंभूराज देसाई यांना पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्यसैनिक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

१) देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री -
घर, ऊर्जा (वगळून अक्षय ऊर्जा), कायदा आणि न्याय व्यवस्था, सामान्य प्रशासन विभाग, माहिती आणि प्रसिद्धी (अन्य विभाग / वाटप न केलेली इतर खाती)

मंत्रिमंडळ विस्तार..

२) एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री - नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

३) अजित आशाताई अनंतराव पवार, उपमुख्यमंत्री - वित्त आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

कॅबिनेट मंत्री

१) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

२) राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

३) हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण

४) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

५) गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

६) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

७) गणेश नाईक -  वन

८) दादाजी भुसे - शालेय शिक्षण

९) संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

१०) धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

११) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

१२) उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

१३) जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

१४) पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

१५) अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा

१६) अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

१७) शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

१८) आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान

१९) दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

२०) अदिती तटकरे - महिला व बालविकास

२१) शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम

२२) माणिकराव कोकाटे - कृषी

२३) जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

२४) नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

२५) संजय सावकारे - कापड

२६) संजय शिरसाट - सामाजिक न्याय

२७) प्रताप सरनाईक - वाहतूक

२८) भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

२९) मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

३०) नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे

३१) आकाश फुंडकर - कामगार

३२) बाबासाहेब पाटील - सहकार

३३) प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्यमंत्री..

३४) माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

३५) आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

३६) मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

३७) इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

३८) योगेश कदम  - गृहराज्य शहर

३९) पंकज भोयर - गृहनिर्माण











सौजन्य - एमएच 24 न्यूज
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !