३१ डिसेंबर रोजी साईबाबा समाधी मंदिर भाविकांसाठी रात्रभर उघडे राहणार!

संगमनेर Live
0
३१ डिसेंबर रोजी साईबाबा समाधी मंदिर भाविकांसाठी रात्रभर उघडे राहणार!

◻️ नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्‍वागताची शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण 

◻️ संस्थानकडून पुढील चार दिवस विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

संगमनेर LIVE (शिर्डी) | श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असुन यानिमित्‍ताने दि. २९ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ अखेर ४ दिवस विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.

यावेळी कोळेकर म्‍हणाले की, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. संस्‍थानकडे शिर्डी महोत्‍सवाकरीता वेगवगळया ठिकाणांहुन येणाऱ्या ८९ पालख्‍यांनी नोंदणी केलेली आहे. या येणाऱ्या साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साईधर्मशाळा व भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) या ठिकाणी ३४ हजार ५०० चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. साईभक्‍तांकरीता सुमारे १२० क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकीटे व सुमारे ४०० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात आलेली आहेत.

उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी नविन दर्शन रांग, श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, गेट नंबर ०४ चे आतील बाजू, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. 

तसेच दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५००रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, नविन दर्शन रांग इमारत, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याकालावधीत भक्‍तांच्‍या सोयीसाठी नविन दर्शनरांग, मंदिर परिसर, साईआश्रम व श्री साईप्रसादालय आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असुन तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्‍तनिवासस्‍थान, धर्मशाळा व श्री साईप्रसादालय येथे रुग्‍णवाहीका तैनात ठेवण्‍यात येणार आहे. 

तसेच सुरक्षेकामी पोलिस निरिक्षक, पोलिस उपनिरिक्षक, पोलिस कर्मचारी, एक शिघ्र कृतीदल पथक, एक बॉम्‍ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्‍तासाठी अतिरिक्‍त  पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक,  पुरुष पोलिस कर्मचारी व महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्‍यात येवून याव्‍यतिरिक्‍त संस्‍थानचे पोलिस निरिक्षक व सुरक्षा कर्मचारी असे एकुण १ हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहे.

मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ या दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्रौ १० वाजता होणारी शेजारती व दिनांक १ जानेवारी रोजी पहाटेची ५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.

नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवा निमित्‍ताने दिनांक २५ डिसेंबर ते बुधवार दिनांक १ जानेवारी २०२४ या नाताळ सुट्यांच्‍या कालावधीत सालाबादप्रमाणे दि. २९ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ अखेर ४ दिवस शिर्डी महोत्‍सव-२०२४ साजरा करण्‍यात येणार आहे. 

यादरम्‍यान आयो‍जीत करण्‍यात आलेल्‍या विविध सां‍स्‍कृतिक कार्यक्रमांची रुपरेषा पुढिलप्रमाणे..

दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत रोहन गावडे, छ. संभाजीनगर यांचा संतवाणी हा कार्यक्रम, दुपारी ३.३० ते ५.३० यावेळेत स्‍वरश्री प्रतिष्‍ठाण, मुंबई यांचा आनंदयात्री हा कार्यक्रम, सायं. ७.०० ते ९.३० वा. पारस जैन, शिर्डी यांचा साईभजन संध्‍या, दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत स्‍वरा म्‍युझीक अकॅडमी, छ. संभाजीनगर यांचा स्‍वर संगीत हा कार्यक्रम, दुपारी ३.३० ते ५.३० यावेळेत प्रविण महामुनी, शिर्डी यांचा साईभजन संध्‍या, सायं. ७.०० ते ९.३० वा. लक्ष चावला, हरियाना यांचा साईभजन संध्‍या, दि. ३१ डिसेंबर रोजी स. १० ते ११.४५ वा. इंडियन आयडॉल फेम कु. सुरभि कुलकर्णी, कोपरगाव यांचा गीत सुरभि हा कार्यक्रम, दुपारी १ ते ३ यावेळेत विजय घाटे, मुंबई यांचा ताल चक्र हा कार्यक्रम, दुपारी ३.३० ते ५.३० यावेळेत साई स्‍वरांजली म्‍युझिकल ग्रुप, नागपूर यांचा साईभजन, सायं. ७.०० ते ९ वा. नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन संध्‍या, रात्री ९.३० ते १२ वा. जगदिश पाटील, ठाणे यांचा साईभजन संध्‍या.

तसेच दि. १ जानेवारी रोजी स. १० ते ११.४५ वा. आर. डी. म्‍युझीक अकॅडमी, श्रीरामपूर यांचा साईभजन हा कार्यक्रम, दुपारी १ ते ३ यावेळेत ह.भ.प. कुळमेथे महाराज, नाशिक रोड यांचा संगीतमय साईकथा हा कार्यक्रम, दुपारी ३.३० ते ५.३० यावेळेत विजय गुजर, जोगेश्‍वरी यांचा साईभजन संध्‍या, सायं. ७ ते ९.३० वा. नूर-ए-साई ट्रस्‍ट, लखनौ यांचा साईभजन संध्‍या आदी कलाकारांचे साईभजने व भक्‍ती गीतांच्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. 

दरम्यान हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार असल्‍याचे सांगुन शिर्डी महोत्‍सवानिमित्‍ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या साईभजन संध्‍या कार्यक्रमांचा जास्‍तीत-जास्‍त श्रोत्‍यांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहनही कोळेकर यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !