डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयात ‘कृषी शिक्षण दिन’ साजरा
संगमनेर LIVE (नगर) | ३ डिसेंबर हा दिवस भारताचे पहिले राष्ट्रपती व कृषी मंत्री डॉ. राजेद्र प्रसाद यांचा जन्मदिन राष्ट्रीय कृषी दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. यानिमित्त लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, विळदघाट येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची कॉलेजच्या परिसरात कृषी शिक्षणाच्या अनुषंगाने विविध विषयावर शिवार फेरी आयोजित करण्यात आली. त्याच प्रमाणे या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले.
या दरम्यान भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (शिक्षण) उपसंचालक डॉ. आर .सी. अग्रवाल यांनी कृषी शिक्षणाबाबत सविस्तर प्रबोधन केले. सद्यस्थितीतील शिक्षणाचे महत्व, सद्यस्थिती, भविष्यातील संधी आणि गरज तसेच राष्ट्रीय स्तरावर उपयुक्त आणि त्यावरील गरजेनुरुप उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच चालू वर्षापासून कृषी शिक्षणात नवीन राष्ट्रीय शिक्षण प्रणाली - २०२० नुसार बदल सुचविण्यात आलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एम. बी. राऊत, सहयोगी प्राध्यापक डॉ. एच. एल. शिरसाठ, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे, डॉ. व्ही. एस. निकम, प्रा. किशोर मोरे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील पूर्वस्थितीतील कृषी व्यवसाय परिस्थिती आणि सद्यपरिस्थितीत सुधारित शेती व्यवसाय उदा. उच्च तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सिंचन पद्धती, पशुसंवर्धन तंत्रज्ञान, फळबाग तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पद्धती इत्यादी बाबत झालेला बदल कृषी शिक्षणाद्वारे झालेला असून पुढील काळात देखील अजून अद्ययावत असा बदल दिसून येईल. तसेच नवीन पिढीने कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान नाविण्यपूर्ण संशोधन या क्षेत्रात स्वतःची आवड निर्माण करावी या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
यावेळी सहयोगी प्राध्यापक डॉ. एच. एल. शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे महत्व व उपप्राचार्य डॉ. एम. बी. राऊत यांनी कृषी क्षेत्रामधील संधी याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. एस. अनारसे व आभार प्रा. के. एस. दांगडे यांनी केले.