तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नव्या लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होईल

संगमनेर Live
0
तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नव्या लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होईल 

◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली भिती 

◻️ मी हिंदू मात्र, इतर धर्मियांचा कधी द्वेष केला नाही

◻️ हा पराभव नव्हे तर, घात! - डॉ. सुधीर तांबे

◻️ संगमनेर येथे आयोजित स्नेहसंवाद मेळावा विराट गर्दीत संपन्न 

संगमनेर LIVE | गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मागील ४० वर्ष अविश्रांत काम केले. त्यातून संगमनेर तालुका उभा राहिला. ही परंपरा आपल्याला यापुढेही जपायची आहे. तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होणार आहे. हिंदू - मुस्लिम द्वेष पसरून काहींनी राजकारण केले. मीही हिंदू आहे पण, सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. संकटे आली तरी घाबरायचे नाही. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे. जनता आपल्या सोबत असल्याने आपण लढणार आहोत असे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

यशोधन संपर्क कार्यालयाजवळील मैदानावर झालेल्या स्नेहसंवाद मेळाव्यात बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, हिरालाल पगडाल, वसीम भाई आदी उपस्थित होते

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की , तालुक्यातील जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले. ४० वर्ष या विभागाचे नेतृत्व करताना अविश्रांत काम केले. मोठ्या कष्टातून तालुका उभा केला. दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका असा लौकिक देशात पोहोचविला. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला. तालुक्यातील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण केले. कधीही कोणाला त्रास दिला नाही. कधी चुकीचा शब्द बोललो नाही. कुणाचे मन दुखवले नाही.

१९८५ मध्ये पाण्यासाठी मोठा संघर्ष केला त्यातून ३० टक्के हक्काचे पाणी तालुक्याला मिळाले. ९९ मध्ये राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. एकही दिवस वाया न घालवता आदर्श पुनर्वसन करून धरण व कालवे पूर्ण केले. ज्यांनी या कामांमध्ये कोणतेही योगदान दिले नाही ते आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे. परंतु काम कोणी केले. हे जनतेला माहित आहे. अजूनही ज्या लोकांना पाणी मिळाले नाही त्यांना पाणी देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.

निवडणूक संपली की राजकारण संपले अशी आपली पद्धत आहे. हीच परंपरा आपल्याला जपायची आहे. काही लोकांना तालुक्याचा विकास मोडायचा असून नवीन लोकप्रतिनिधीचा ते हत्यार म्हणून वापर करतील. तालुक्याचे पाणी पळवतील. विकास मोडीत काढतील हे आपल्याला होऊ द्यायचे नाही. आपल्यातील मतभेद मिटवा संघटित होऊन लढायचे आहे

मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. जनता आपल्याबरोबर असल्याने आपल्याला लढायचे आहे.

आपला सहकार चांगला आहे. बाजारपेठ चांगली आहे. शेती समृद्ध झाली आहे. बायपास, हॅपी हायवे सह बसस्थानक, शहरातील भव्यदिव्य इमारती आणि निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन असे अनेक मोठमोठे प्रकल्प आपण राबवले आहे. काम केले त्याबद्दलची कृतज्ञता सर्वांनी ठेवली पाहिजे.

१९८५ पूर्वी संगमनेर हे दंगलीचे शहर म्हणून ओळखले जायचे. परंतु ४० वर्ष सर्व समाजामध्ये आपण बंधुभाव निर्माण केला. एक आदर्श वातावरण तयार केले. मी ही हिंदू आहे. परंतु इतरांचा कधीही द्वेष केला नाही. मानवता हा धर्म पाळून काम करत आहोत. मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अनेक तीर्थस्थळ उभे केली आहेत. परंतु विरोधकांनी काही खोट्या एजन्सी तयार करून खोटे व्हिडिओ टाकून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे.

सत्तेचा गैरवापर करून तालुक्यातील आपल्या अनेक कार्यकर्त्यांवर त्यांनी खोट्या केसेस टाकल्या. अनेकांच्या प्रपंचात माती कालवली. हे सर्व थांबवण्यासाठी आपण शिर्डी मतदार संघात जाऊन लढा दिला. यापुढेही आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन लढायचे आहे असे ते म्हणाले

माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत सेवाभावीपणे काम करून तालुका उभा केला. भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी मिळवले. निळवंडे धरण व कालवे निर्माण केले. देशासाठी आदर्शवत सहकार निर्माण केला. गावागावात विकासाची कामे केली. मंत्रीपदाच्या माध्यमातून संगमनेरचा लौकिक राज्यभर वाढवला

लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे व्यक्तिमत्व आणि काम आपल्या पाठीशी आहे. खोटे नाटे व्हिडिओ पसरून घाणेरडे राजकारण केले जात आहे .परंतु आपण लढणारी माणस आहोत. आमदार थोरात यांनी कायम आदर्श मूल्य जपली. राजकारणातील पावित्र्य जपले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते दुःखी झाले असतील मात्र निराश होणार नाही येणाऱ्या काळामध्ये या संकटावर मात करून पुन्हा राज्याचे नेतृत्व संगमनेर तालुक्याकडे येईल यासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केले

यावेळी सौ‌ दुर्गाताई तांबे, डॉ‌ जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर यांसह तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

विविध मंत्री पदाच्या माध्यमातून ऐतिहासिक काम..

१९९९ ला राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आणि निळवंडे धरण हाती घेतले. कृषी मंत्री पदाच्या काळामध्ये विद्यापीठांना संशोधनाला चालना देऊन राज्यात सर्वाधिक कृषी उत्पादन केले. जलसंधारण मंत्री असताना एक लाख शेततळी निर्माण केली. तर शिक्षण मंत्री असताना बेस्ट ऑफ फाईव्हचा ऐतिहासिक निर्णय घेतला. महसूल मंत्रीपदाच्या काळामध्ये विविध देवस्थानच्या जमिनी, खंडकरी शेतकरी प्रश्न, नझुल जमीन असे अनेक प्रश्न सोडवताना या खात्याला लोकाभिमुख केले. 

प्रदेशाध्यक्ष, गटनेता, १७ वर्ष मंत्री, ४० वर्षे आमदार याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर काम करताना गुजरात आणि हिमाचल प्रदेशची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आणि आता काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण २१ लोकांच्या कमिटी मध्ये समावेश हा संगमनेर तालुक्यातील जनतेचा सन्मान आहे. निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले आता हे पाणी कालव्याच्या वरच्या भागात देण्यासाठी सुद्धा आपण काम करणार असून झालेल्या चुकांची दुरुस्ती केली जाईल असे आमदार थोरात म्हणाले

हा पराभव नाही तर घात - डॉ तांबे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राजकारणातील पावित्र्य जपले. कधीही तत्त्वांची तडजोड केली नाही मात्र जातीय तणाव निर्माण करून द्वेष भावना पसरून घाणेरडे राजकारण करणाऱ्या मंडळींनी संस्कृत नेतृत्वाचा पराभव नव्हे तर घात केला असल्याची टीका माजी आमदार डॉ  सुधीर तांबे यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !