मजबूत भारत घडविण्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मोठे योगदान
◻️ काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात वाहिली श्रद्धांजली!
संगमनेर LIVE | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. जगाशी स्पर्धा करणारा मजबूत भारत घडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. अशा भावना काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, एका जागतिक अर्थशास्त्रज्ञाला आपण मुकलो आहोत. सन १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मनमोहन सिंग यांना प्रथमताच अर्थ खात्याची जबाबदारी मिळाली. याच काळात आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी अर्थव्यवस्थेची दिशा बदलून दाखविली. आज जो सामर्थ्यशाली भारत निर्माण झाला आहे त्यामध्ये मनमोहन सिंग यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांचा मोठा वाटा आहे.
पंतप्रधान म्हणून सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर त्यांनी भर दिला. सामान्य माणसांच्या हक्कांचे रक्षण करून, त्यांचा आवाज बुलंद केला. सन २००८ मध्ये राष्ट्रव्यापी शेतकरी कर्ज माफी जाहीर करून त्यांनी देशातील शेतकऱ्यांना धीर दिला. याशिवाय राष्ट्रीय रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळखपत्र अर्थात आधार, लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात लाभ मिळवून देणे, अन्नसुरक्षा कायदा यासारखे धाडसी निर्णय त्यांनी केले.
राजकीय हेतूने मनमोहन सिंग यांच्यावर टीका झाली असली, तरीही इतिहास मात्र त्यांची नोंद अत्यंत सकारात्मक घेईल. असा विश्वास व्यक्त केला.
तसेच एक सामर्थ्यशाली देश घडविणाऱ्या कणखर आणि खंबीर नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली. या शब्दात काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.