डॉ. आंबेडकरानी दिलेल्या संविधानामुळे सर्वाना समतेचा अधिकार - बाळासाहेब थोरात
◻️ महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन
संगमनेर LIVE | दीन दलितांच्या हक्कासाठी मोठा संघर्ष करणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाते. मानवता धर्म जोपासणाऱ्या राज्यघटनेची अमूल्य देणगी त्यांनी देशवासीयांना दिली असून या संविधानामुळे सर्वाना समतेचा अधिकार मिळाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात आदि उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर दीन - दलित आणि गोर - गरिबांसाठी जे मोठे संघर्ष आहेत त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला लढा हा सर्वात मोठा आहे. सर्व संत व समाज सुधारक यांना अपेक्षित मानवतेचा धर्म सांगणारी राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासीयांना दिली. राज्यघटनेमुळे सर्वांना समतेचा अधिकार मिळाला आहे. ही राज्यघटना प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची असून सध्या संविधान धोक्यात आले आहे.
या संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. याचबरोबर जातीयवादी तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींपासून तरुणांनी दूर राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता व बंधुता या तत्त्वांच्या विरोधात काही धर्मांध शक्ती काम करत आहेत. दररोज राज्यघटना कमकुवत केली जात आहे. धर्माच्या नावावर राजकारण करून समाजात भांडणे लावली जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.