डॉ. आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य हीचं भाजपाची खरी प्रवृत्ती - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
डॉ. आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य हीचं भाजपाची खरी प्रवृत्ती - बाळासाहेब थोरात 

◻️ महामानवावरील वक्तव्याचा तसेच परभणी व बीड घटनेचा संगमनेर येथे निषेध

◻️ राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासाळल्याचा आरोप करत बाळासाहेब थोरात यांची सरकारवर घणाघाती टिका

संगमनेर LIVE | लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेवर यायचे आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्य पायदळी तुडवायची ही भाजपची नीती आहे. केंद्रिय मंत्री अमित शहा यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य ही भाजपाची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती असल्याची खरपूस टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकासह आघाडीच्या वतीने आयोजित भव्य निषेध आंदोलनात बाळासाहेब थोरात बोलत होते.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, शिवसेनेचे अमर कातारी, रिपाईचे बाळासाहेब गायकवाड, प्रा. हिरालाल पगडाल यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, छात्र भारती, पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी व विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संविधान करते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्थ असून हे एका व्यक्तीचे वक्तव्य नसून ही भाजपची प्रवृत्ती आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळतो आहे. भाजपची महाराजांवर कधीही श्रद्धा नव्हती. या घटनेतील भ्रष्टाचाराची चौकशी नाही. मणिपूर मधील आदिवासी भगिनींवर अत्याचार झाले त्याबद्दल पंतप्रधान महोदयांनी एक शब्दही निषेध व्यक्त केला नाही.

परभणी मध्ये दलित कार्यकर्त्याचा कोठडीत मृत्यू होतो. त्याची खरी चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे बीड मधील सरपंचाची हत्या करण्यात आली. यामागे कोण आहे. खरे आरोपी शोधले पाहिजे. या आरोपींना संरक्षण मिळते की काय अशी शंका आता निर्माण होत आहे.

आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेतला जात आहे. आंदोलन केले म्हणून मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला होतो. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यास संसदेमध्ये जाण्यापासून खा. राहुल गांधी व इतरांना रोखले जाते. डॉ आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याच्या घटनेवरून प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी काहीतरी खोटी घटना दाखवून राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे टाकले जातात हा काय न्याय आहे.

देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. हे सर्व जपण्यासाठी आपल्या सर्वांना लढावे लागणार आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया याचबरोबर अमित शहा यांनी केलेले वक्तव्य तसेच परभणी आणि बीड मधील घटनेचा आपण तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, देशभरामध्ये अस्थिरता वाढते आहे. जातीभेद निर्माण केला जात आहे. झालेल्या घटना या अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना निर्माण करून ते राज्यघटना बदलण्याची पायाभरणी करत आहेत. आपण अशा घटना विसरून गेलो तर सर्वांना मोठा पश्चाताप होणार आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात एकसंघ व्हा..

औरंगाबाद मराठवाडा नामांतरणाच्या आंदोलनामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नेतृत्व केले आणि कारावासही भोगला. त्यांच्या मार्गदर्शनात संगमनेर तालुका राज्यासाठी दिशादर्शक ठरला. गोरगरीब, शेतकरी, आदिवासी, दलित, व्यापारी, महिला, युवक हे सर्व सुखी नांदत होते. परंतु ईव्हीएमच्या घोटाळ्यातून झालेल्या पराभवामुळे संपूर्ण तालुका अस्वस्थ असून येणाऱ्या काळात काय होणार ही चिंता आहे. बाळासाहेब थोरात हे संघर्षशील नेतृत्व आहे. सर्वसामान्यांच्या सुखासाठी आणि शांततेसाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकसंघ रहावे असे आवाहन बाळासाहेब गायकवाड यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !