◻️ जयहिंद आनंद महोत्सवात ७ हजार दोनशे विद्यार्थ्यी होणार सहभागी
◻️ तीन दिवस विद्यार्थ्याना विविध प्रकारच्या २१ कलांचे शिक्षण मिळणार
संगमनेर LIVE | निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने विद्यार्थ्याना विविध कलांचे प्रशिक्षण देण्याकरता आयोजित केलेल्या हा भव्य कला महोत्सव नक्कीच आनंद महोत्सव ठरणार आहे. त्यामुळे यात सहभागी होणाऱ्या बालकांच्या कलागुणांना मोठा वाव मिळणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळच्या वतीने आयोजित तीन दिवसीय कला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, बालभारतीचे डॉ. अजित कुमार लोळगे, व्यवसाय मार्गदर्शक दिपाली जोगदंड, राजेंद्र वाकळे, डॉ. नामदेवराव गुंजाळ, प्रकल्प प्रमुख प्रकाश पारखे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेरमध्ये सातत्याने विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असते. यावर्षी होणाऱ्या कला महोत्सवातून ७ हजार २०० विद्यार्थी सहभागी होणार असून ते एकाच वेळी समूहगान करणार आहे. हे अत्यंत कौतुकास्पद ठरणारे आहे. गायन वादन याचबरोबर वेगवेगळे छंद हे विद्यार्थ्यानी जोपासले पाहिजे. त्यामुळे जीवनाचा आनंद मिळतो.
तीन दिवसातील या कला महोत्सवांमधून स्क्रीन पेंटिंग, अक्षरलेखन, मातीकाम, निसर्ग चित्र, स्क्रीन प्रिंटिंग, सौंदर्यप्रसाधने असे वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचे प्रशिक्षण तज्ज्ञ व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या सर्वांचा आनंद घ्या. व्यक्तिमत्व परिपूर्ण करण्यासाठी अभ्यासाबरोबर खेळ आणि छंदही महत्त्वाचे असून हा कला महोत्सव पाहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही उपस्थित असावे असेही ते म्हणाले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने उपक्रमांचे आयोजन आपण करत असतो. जयहिंद च्या वतीने निरोगी सदृढ समाज निर्मिती हे युवकांच्या माध्यमातून हाती घेतलेले कार्य असून पर्यावरण शिक्षण आरोग्य सामाजिक सुरक्षा या सर्व बाबतींमध्ये काम केले जात आहे.
चांगल्या समाजासाठी चांगले युवक घडवणे आवश्यक असून हे संस्कार बालवयात मिळाले तर सक्षम भारताच्या निर्मितीसाठी भविष्यात हे युवक काम करतील. या कला महोत्सवांमधील विविध कलांचे प्रशिक्षण आणि सक्रिय कृतिशील सहभाग यामुळे विद्यार्थ्यांना मोठा भाव मिळणार आहे.
यावेळी बाबुराव गवांदे ,दत्तात्रय चासकर, केजी खेमनर, गणेश मादास, लक्ष्मण बर्गे, प्रमिलाताई अभंग, सुरेश झावरे, जय हिंद चे अनंत शिंदे, विकास भालेराव आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर प्रकल्प प्रमुख प्रकाश पारखे यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक कला व क्रीडा शिक्षक आणि एक हजार विद्यार्थी उपस्थित होते.
तीन दिवसात २१ स्टॉल मधून प्रशिक्षण..
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात विविध कलांचे २१ स्टॉल उभारण्यात आले आहे. यामध्ये ओरिगामी, स्क्रीन पेंटिंग, पेपर कॉलिंग, रांगोळी, कागदी फुले बनवणे, पतंग बनवणे, सायकल रिपेरिंग, मातीकाम, निसर्ग चित्र, कॅनव्हास पेंटिंग, अक्षरलेखन, माहिती तंत्रज्ञान, सौंदर्य प्रसादने असे विविध २१ स्टॉल आहे. यामध्ये दररोज अडीच हजार विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत. तसेच हा कला महोत्सव सर्वांसाठी खुला असून सर्व पालक व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले.