श्रीरामपूर कार्यक्षेत्रातील जुन्या वाहनांना ’एचएसआरपी’ बसविण्याचे आवाहन
◻️ सर्व जुन्या वाहताना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' बसविण्याचा शासन निर्णय
◻️ श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, राहाता, कोपरगांव, संगमनेर, अकोले तालुक्याचा समावेश
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्याकरिता १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' (एचएसआरपी) बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनांना नंबर प्लेट बसविणे करीता सेवा पुरवठादार एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स या संस्थेची यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवापुरवठादार यांचे अधिकृत संकेतस्थळ htttp://maharashtrahsrp.com या संकेतस्थळावर जाऊन वाहन क्रमांकाची 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, राहाता, कोपरगांव, संगमनेर, अकोले या तालुक्यांकरीता सेवापुरवठादार यांच्याकडून श्रीरामपूर येथील मुळे मोटर्स, बेलापुर रोड श्रीरामपूर, राहुल ट्रॅक्टर्स श्रीरामपूर, शिरोडे ऑटोमोबाईल्स प्रा. लि. श्रीरामपूर हे अधिकृत फिटमेंटर सेंटर नियुक्त करण्यात आलेले आहेत.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी वाहन व ट्रॅक्टर्ससाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी, प्रवासी चारचाकी, ट्रक, ट्रेलर्स व इतर वाहनांसाठी ७४५ रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे. सर्व वाहनधारकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी केले आहे