◻️ संगमनेर येथे सहकारमहर्षी टी - २० क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू
◻️ १० हजार प्रेक्षकांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था
संगमनेर LIVE | माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये तरुणांना करिअरसाठी संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. २५ वर्षापासून जयहिंदच्या वतीने सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचे आयोजन होत असून संपूर्ण मैदानावर हिरवळ, विकेट यासह राज्यभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा राज्यपातळीवर लौकिकास्पद ठरली असून पुढील पंधरा दिवसांमध्ये क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आयोजक तथा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने आयोजित सहकारमहर्षी टी - २० क्रिकेट स्पर्धेच्या २५ वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर मध्ये सुसज्ज क्रीडा संकुल व्हावे ही भाऊसाहेब थोरात यांची खूप इच्छा होती. याकरता त्यांनी शेतकी संघाची एक एकर जागा व उर्वरित जागा गोखले एज्युकेशन कडून घेऊन क्रीडा संकुलाला दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये अत्यंत अद्यावत असे हे क्रीडा संकुल उभारले गेले. खेळाच्या सुविधा निर्माण केल्या गेल्या.
राज्यभरात कोठे नाही अशी व्यवस्था आपण तयार केली आहे. मागील पंचवीस वर्षापासून जयहिंदच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धा होत असून अत्यंत चांगल्या नियोजनामुळे आयपीएल आणि रणजी मधील अनेक खेळाडू या ठिकाणी सहभागी होत असतात. प्रत्येक सामन्यासाठी प्रेक्षकांची मोठी उपस्थिती राहत असून येणाऱ्या १७ दिवसांमध्ये संगमनेर मधील सर्व क्रीडा रसिकांसाठी या स्पर्धा मोठी मेजवानी ठरणार आहे.
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, क्रिकेट या खेळांमधून सांघिक भावना वाढीस लागत असून जय पराजय पेक्षा खिलाडू वृत्ती निर्माण होते. हे अत्यंत चांगले आहे. संगमनेरचे नाव क्रिकेट मधून अजिंक्य रहाणे सह अनेकांनी देशपातळीवर नेले आहे. या पुढील काळातही युवकांनी विविध खेळांमधून संगमनेरचे नाव देशपातळीवर पुढे घेऊन जावे असे आवाहन त्यांनी केले.
गिरीश मालपाणी म्हणाले की, खेळाडूंसह प्रेक्षकांसाठी असलेल्या चांगल्या सुविधांमुळे या प्रत्येक सामन्याचा थरार हा रोमांचकारी ठरत असतो.
सहकारमहर्षी टी - २० क्रिकेट स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजनामध्ये क्रीडा संकुलाच्या संपूर्ण मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्याप्रमाणे लॉन तयार करण्यात आली असून टर्फ विकेट बनवण्यात आली आहे. व्हीआयपी बैठक व्यवस्थेसह १० हजार नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरी, संगीतवाद्य, आकर्षक सजावट, ऑनलाइन प्रक्षेपण, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. अशा परिपूर्ण तयारीमुळे ही स्पर्धा आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या स्पर्धेनिमित्त संगमनेरचे भूषण अजिंक्य रहाणे सह विविध राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटपटू भेट देणार आहेत. क्रीडा संकुलात सर्वांसाठी मोफत प्रवेश असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.