मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे वरवंडी - थापलिंग रस्त्याचे काम पूर्ण
◻️ जिल्हा परिषदेच्या २५:१५ निधीतून काम केल्याची सौ. मीराताई शेटे यांची माहिती
संगमनेर LIVE | पठार भागातील वरवंडी येथील थापलिंग खंडोबा देवस्थान ते शिंदोडी ठाकरवाडी रस्त्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून या कामाला निधी मिळाला होता. या निधी मधूनच या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या रस्त्यावरची कमान आपण स्वखर्चाने दिली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ. मीराताई शेटे यांनी दिली.
खंडोबा थापलिंग रस्त्याबाबत माहिती देताना सौ. शेटे म्हणाल्या की, वरवंडी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मी जिल्हा परिषद सदस्य असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या निधीतून या रस्त्याच्या कामासाठी २५:१५ योजनेअंतर्गत निधी दिला होता.
लोकसभा आणि विधानसभेच्या आचारसंहितेमुळे काही दिवस काम खोळंबले होते मात्र, सभापती शंकर पाटील खेमनर व आपण स्वतः या रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने पाठपुरावा केला आणि रस्त्याचे काम पूर्ण केले. यामध्ये वरवंडीच्या अनेक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. पठार भागातील वाडीवस्तीवर रस्त्याच्या कामांसह विविध विकास कामांच्या योजना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केल्या आहेत.
तालुक्यात किंवा पठार भागातील रस्त्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे झालेला रस्ता हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातूनच पूर्ण झाला असून या रस्त्यावर असलेली कमान ही मी स्वखर्चातून दिली आहे. हे सर्व वरवंडी व परिसरातील नागरिकांना माहिती आहे. त्यामुळे श्रेय घेणाऱ्यांनी नवीन रस्त्यांकरता निधी आणावा आणि काम करावे. मात्र जुन्या कामांची मंजुरी व झालेल्या कामांचे श्रेय घेऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे.