संगमनेर येथील सहकाराचे तीर्थक्षेत्र जगासाठी दिशादर्शक - इंद्रा उदयन
◻️ इंडोनेशिया येथील गांधीवादी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन यांनी दिली अमृत उद्योग समूहाला भेट
संगमनेर LIVE | सहकार चळवळ ही गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सुरू झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी सहकार अडचणीत असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे सहकार मॉडेल हे राज्यासाठी, देशासाठी व जगासाठी दिशादर्शक ठरले असल्याचे गौरवोद्गार इंडोनेशिया मधील गांधीवादी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन यांनी काढले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, पुरोगामी विचाराचे प्रा. हिरालाल पगडाल, डॉ. नामदेवराव गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी पद्मश्री उदयन यांनी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांना भेटी दिल्या.
यानंतर बोलताना पद्मश्री उदय म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ओळख ही राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे आहे. सत्य व अहिसा हे तत्व जगाला देणारे गांधीजींचे विचार जगासाठी सदैव अनुकरणीय आहे. प्रत्येक माणसाला शांतता व समृद्धी हवी आहे, आणि त्यासाठी गांधी विचारच गरजेचा आहे.
खेड्याकडे चला हा मंत्र गांधीजींनी दिला, आणि त्या माध्यमातून सहकाराची खऱ्या अर्थाने निर्मिती झाली. एकमेकाला सहाय्य करत गोरगरिबांचा उद्धार करणारे हे माध्यम आहे. संगमनेरमध्ये स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी उभे केलेले हे सहकाराचे मॉडेल आज देशातील इतरांसाठी आदर्शवत ठरले आहे.
सध्या भारतामध्ये धार्मिकता व जातीयतेचे राजकारण केले जात आहे. परंतु मानवता हा खरा धर्म आहे. मानवता धर्म हा संत महात्मे, समाज सुधारक व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आहे.
तरुणांनी गांधीजी अभ्यासले पाहिजे. याचबरोबर त्यांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अनेक बाबींपासून युवकांनी सावध रहावे.
इंडोनेशियातील बाली मध्ये गांधी विचारांचे मोठे स्मारक असून जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक तरुणांना काम करता येण्याची संधी असल्याचे त्यांनी म्हटले.
निरोगी समाज निर्मितीसाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असून प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात हा विचार पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने काम होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
माजी मंत्री थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचार घेऊन इंडोनेशियामध्ये काम करणारे इंद्रा उदयनजी हे खऱ्या अर्थाने गांधीजींचे शिष्य आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले आहे.
डॉ. तांबे म्हणाले की, पद्मश्री उदयनजी आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या माध्यमातून निरोगी समाज निर्मितीसाठी यापुढे राज्यभर आणि देशातही काम करण्यासाठी तरुणांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन केले.